Atal Bihari Vajpayee : वाजपेयींनीच दाखविली होती 56 इंचाची छाती..! 

गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्देगिरी आणि धोरणीपणाचे उत्तम उदाहरण म्हणजे भारताने पोखरणमध्ये घेतलेली अणुचाचणी! या विषयावर काही दिवसांपूर्वीच चित्रपटही प्रदर्शित झाला होता. संपूर्ण जगाला अंधारात ठेवत भारताने 1998 मध्ये पोखरणमध्ये अणुचाचणी घेतली होती. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने उचललेल्या या धाडसी पावलामुळे देशाच्या प्रगतीला 'बूस्ट' मिळाला. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्देगिरी आणि धोरणीपणाचे उत्तम उदाहरण म्हणजे भारताने पोखरणमध्ये घेतलेली अणुचाचणी! या विषयावर काही दिवसांपूर्वीच चित्रपटही प्रदर्शित झाला होता. संपूर्ण जगाला अंधारात ठेवत भारताने 1998 मध्ये पोखरणमध्ये अणुचाचणी घेतली होती. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने उचललेल्या या धाडसी पावलामुळे देशाच्या प्रगतीला 'बूस्ट' मिळाला. 

11 ते 13 मे, 1998 या तीन दिवसांच्या कालावधीत भारताने पाच स्फोट करून चाचण्या घेतल्या. या चाचण्यांची तयारी कमालीची गोपनीय राखण्यात आली होती. संपूर्ण जगाची पोलिसगिरी करणाऱ्या अमेरिकेच्या 'सीआयए'लाही या चाचणीचा सुगावा लागू शकला नाही, यातच भारताचे राजनैतिक आणि धोरणात्मक यश होते. ही मोहीम इतकी गोपनीय राखण्यात आली होती, की केंद्र सरकारमधील निवडक अधिकाऱ्यांनाच यासंदर्भात माहिती होती. किंबहुना, तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांनाही याची कल्पना देण्यात आली नव्हती. 

या मोहिमेविषयी खुद्द पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, वाजपेयींचे तत्कालीन सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी, संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस, अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर, लष्करातील मोजके अधिकारी आणि या प्रकल्पावर काम करणारे 58 अभियंते यांनाच कल्पना होती. 

प्रत्यक्ष चाचण्यांपूर्वी दहा दिवस त्याची तयारी सुरू झाली होती. त्यासाठी लागणारी यंत्रे आणि इतर साहित्य मुंबईहून केवळ चार ट्रकमधून पोखरणमध्ये आणण्यात आले. अमेरिकी उपग्रहांची भारतावरील 'नजर' चुकवून ही सर्व तयारी करण्यात आली. चाचणी घेतल्याचे जाहीर केल्यानंतर केवळ इस्राईलनेच भारताला पाठिंबा दिला होता. अमेरिकेसह अन्य देशांनी भारतावर टीका केली होती. संतप्त अमेरिकेने तर भारतावर निर्बंधही लादले होते. 

वाजपेयी सत्तेत येण्यापूर्वी पी. व्ही. नरसिंह राव यांनीही अणुचाचणी, थर्मोन्युक्‍लिअर बॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेण्याची तयारी केली होती. मात्र, अमेरिकी उपग्रहांनी याची छायाचित्रे टिपल्यामुळे अमेरिकेच्या दडपणाखाली भारताला चाचणी घेता आली नाही. 

1998 मध्ये वाजपेयींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर दोनच दिवसांत त्यांनी डॉ. कलाम आणि आर. चिदंबरम यांची भेट घेतली. 'चाचणी घेण्यासाठीची तयारी किती दिवसांत होऊ शकेल', असा प्रश्‍न वाजपेयी यांनी डॉ. कलाम यांना विचारला. त्यावर डॉ. कलाम म्हणाले, 'तुम्ही आज होकार दिला, तर पुढच्या 30 दिवसांत चाचणी घेऊ!' त्या बैठकीत तारीख ठरली.. 11 मे, 1998! 

त्या काळात जगात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया वगळता इतर कोणत्याही देशाकडे अण्वस्त्रे नव्हती. तरीही भारताने धाडस करून हे पाऊल उचलले. 

या अणुचाचणीची घोषणा करतानाच पंतप्रधान वाजपेयी यांनी लोकसभेत तीन महत्त्वाची विधाने केली. 

  1. कुठल्याही युद्धामध्ये आम्ही प्रथम अण्वस्त्रे वापरणार नाही. 
  2. ज्या देशाकडे अण्वस्त्र नाही, त्यांच्याविरोधात आम्ही त्यांचा वापर करणार नाही. 
  3.  यापुढे भारत अण्वस्त्र चाचणी घेणार नाही. 

Web Title: How Atal Bihari Vajpayee conducted Pokhran Nuclear tests