दप्तर झाले हलके; दुसरीपर्यंत गृहपाठही नाही 

school bags
school bags

नवी दिल्ली  : दप्तराच्या ओझ्याने वाकलेल्या आणि गृहपाठाच्या बडग्याने पिचलेल्या चिमुकल्यांना केंद्र सरकारने आज मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराची वजनमर्यादा निर्धारित केली असून, इयत्ता पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांची गृहपाठाच्या जाचातून मुक्तता करण्यात आली आहे. 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दप्तरांचे वजन, विविध विषयांचे अध्यापन आणि गृहपाठाबाबत मार्गदर्शक नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. शैक्षणिक संस्थांनी इयत्ता पहिली आणि दुसरीतील विद्यार्थ्यांना गृहपाठ देऊ नये, अशी स्पष्ट सूचना केंद्राच्या आदेशात देण्यात आली आहे. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दप्तराचे कमाल वजन ठरवण्यात आले आहे. त्यानुसार पहिली व दुसरीसाठी दप्तराचे वजन दीड किलोपेक्षा जास्त असू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) निर्धारित केल्यानुसार शाळांनी पहिली व दुसरीसाठी भाषा व गणिताखेरीज अन्य विषय शिकवू नयेत. तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांना भाषा, ईव्हीएस (एन्व्हॉयर्न्मेंट स्टडीज) आणि गणिताव्यतिरिक्त अन्य विषय शिकवू नयेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना अतिरिक्त पुस्तके, वह्या व अन्य शैक्षणिक साहित्य आणण्याची सक्ती करू नये, असे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिले आहेत. 

दप्तराची वजनमर्यादा 
- पहिली व दुसरी : दीड किलो 
- तिसरी ते पाचवी : दोन ते तीन किलो 
- सहावी व सातवी : चार किलो 
- आठवी व नववी : साडेचार किलो 
- दहावी : पाच किलो 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com