रोहितच्या मृत्यूचा अहवाल सार्वजनिक करण्यास नकार

वृत्तसंस्था
रविवार, 22 जानेवारी 2017

रोहितच्या आत्महत्येबद्दलचा अहवाल न्यायालयाने राखून ठेवला असल्याने ही माहीती देता येणार नाही असे उत्तर मंत्रालयाकडुन देण्यात आले.

नवी दिल्ली - रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे कारण सार्वजनिक करण्यासाठी माहिती अधिकारांतर्गत करण्यात आलेला अर्ज फेटाळून लावत मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून माहिती सार्वजनिक करण्यास नकार देण्यात आला आहे.

हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याने विद्यापीठातच आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येनंतर देशभर खळबळ उडाली होती. रोहितच्या मृत्यूबद्दल कुलगुरू व केंद्रीय मंत्र्यांना दोषी धरत त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तसेच त्याच्या जातीवरूनही वाद निर्माण झाला होता. 

रोहितच्या आत्महत्येबद्दलचा अहवाल न्यायालयाने राखून ठेवला असल्याने ही माहीती देता येणार नाही असे उत्तर मंत्रालयाकडुन देण्यात आले. रोहितच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात मानव संसाधन विकास मंत्रालयाने निवृत्त न्यायाधीश अशोक कुमार रुपनवाल यांची एक-सदस्यीय चौकशी आयोगासाठी नेमणूक केली होती. या आयोगाला हैदराबाद विद्यापिठातील विद्यार्थी तक्रार निवारण पद्धतीचे पुनरावलोकन करण्याचे व त्यामध्ये सुधारणा सुचवण्याचे कामही सोपवण्यात आले होते. या आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी 3 महिन्याची मुदत देण्यात आली होती. मात्र हा अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही.

Web Title: HRD ministry rejects RTI plea for sharing report on Rohith Vemula’s death