'यूपी'त शंभरहून अधिक पोलिस निलंबित

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

आदित्यनाथ सरकारने कार्यभार स्वीकारल्यापासूनची कारवाई

लखनौ : कायदा आणि सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीतील हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा कठोर संदेश देताना योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारने कार्यभार स्वीकारल्यापासून उत्तर प्रदेश पोलिस विभागाने 100 पेक्षा जास्त पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.

गाझियाबादमध्ये सर्वाधिक पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, त्यानंतर मेरठ आणि नोएडाचा क्रमांक लागतो. लखनौमध्ये सात निरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांमधील कलंकितांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस महासंचालक जावीद अहमद यांनी काही दिवसांपूर्वी दिल्या होत्या. त्यानंतर ही निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. उत्तर प्रदेश पोलिसचे जनसंपर्क अधिकारी राहुल श्रीवास्तव यांनी याविषयी माहिती दिली आणि 100 पेक्षा जास्त पोलिस कर्मचारी, विशेषत: कॉन्स्टेबल्सना निलंबित करण्यात आल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यांची पोलिस ठाण्याला अचानक भेट
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी हजरतगंज पोलिस ठाण्याला अचानक भेट देऊन पाहणी केली आणि राज्यात कायदा व्यवस्था प्रस्थापित केली जाईल, असे सांगितले. गृह मंत्रालयाची जबाबदारी स्वत:कडे ठेवलेल्या आदित्यनाथ यांनी आज सकाळी ही भेट दिली. राज्यात कायदा सुव्यवस्था कशी राबविली जाते, हे पाहण्यासाठी तसेच पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मी येथे आलो आहे. लोकांच्या कल्याणासाठी आवश्‍यक पावले उचलताना सरकार संकोच करणार नाही, असे त्यांनी सांगितले. आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांकडून पोलिस दलाच्या कामाविषयीची माहिती घेतली आणि गुन्हे शाखा तसेच सायबर सेलचीही पाहणी केली. ही काही शेवटची भेट नाही, तर केवळ सुरवात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: up: hundred more policemen suspended