पत्नीसाठी केला त्याने तिच्याच मैत्रिणीचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

एका इसमाने स्वतःच्या पत्नीला भेटवस्तू खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने पत्नीच्याच एका मैत्रिणीची हत्या केली आहे व तिच्या अंगावरील दागिने लंपास केले आहेत.

तमिळनाडू : चेन्नईतील हुलामीडू भागातील एका इसमाने स्वतःच्या पत्नीला भेटवस्तू खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने पत्नीच्याच एका मैत्रिणीची हत्या केली आहे व तिच्या अंगावरील दागिने लंपास केले आहेत. अजित कुमार असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

जिची हत्या करण्यात आली, ती आर. इलवीझही ही नर्स म्हणून काम करत होती. अजित कुमारची पत्नी व इलवीझही या एकाच ठिकाणी कामाला होत्या, तसेच अजित कुमार हाही त्याच संस्थेत ड्रायव्हर म्हणून कामाला होता. त्याला बायकोला वाढदिवसासाठी भेटवस्तू द्यायची होती, पण पैशाच्या कमतरतेमुळे तो घेऊ शकत नव्हता. म्हणूनच त्याने आपल्या पत्नीची मैत्रिण इलवीझही हिच्या घरी जाऊन तिच्याकडे पैसे उधारीवर मिळण्याची मागणी केली. तसेच गळ्यातील सोन्याची साखळीही मिळेक असे त्याने तिला विचारले. पण यावर तिने नकार दिला. अजित कुमारला या नकाराचा राग आला व रागाच्या भरात अजितने ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली.  

गेले बारा दिवस इलवीझही ही घरातून बेपत्ता होती. त्यानंतर तिच्या वडिलांनी या संबंधी पोलिसांत तक्रारही नोंदवली होती. पण शोधाअंती तिची हत्या झाल्याचे समोर आले. इलवीझही हत्या केल्यानंतर तिच्या अंगावरील १२ ग्रॅमची सोन्याची साखळी, चांदीचे पैजण आणि एक मोबाइल फोन त्याने चोरला. त्यानंतर अजितने एका निर्जनस्थळी जाऊन तिचा मृतदेह फेकून दिला. 

पोलिसांना अजित 6 एप्रिलला इलवीझही घरी गेल्याचे सीसीटीव्ही फुटेझ मिळाले. याचाच आधार घेत त्यांनी पुढील तपास केला व अजित कुमारला अटक केली. 

Web Title: husband murdered his wifes friend