हैदराबाद 'निर्भया' प्रकरण; नागरिक रस्त्यावर, 3 पोलिस निलंबित

वृत्तसंस्था
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

- दिल्लीत युवतीचे संसदेबाहेर आंदोलन 

हैदराबाद/नवी दिल्ली : शहरातील पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि तिच्या हत्येच्या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटले आहेत. या राक्षसी कृत्याबद्दल हैदराबाद आणि तेलंगणमधील नागरिकांनी संताप व्यक्त करीत शादनगर पोलिस ठाण्यासमोर जोरदार निदर्शने केली.  दरम्यान, एफआयआर दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच चारही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

शमशाबाद येथे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. नागरिकांनी शादनगर पोलिस ठाण्यासमोर निदर्शने करीत "आम्हाला न्याय हवा' अशी घोषणाबाजी केली. या गुन्ह्यातील आरोपींना फासावर लटकवावे, अशी मागणीही जमावाने केली. पोलिसांनी ठाण्याभोवतालची सुरक्षाव्यवस्था वाढविली आहे. तेलंगणच्या राज्यपाल डॉ. तमिलीसई सौंदरराजन, चेव्हेल्लाचे खासदार रणजित रेड्डी यांनी आज पीडितांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली.

रंगारेड्डी जिल्हा न्यायालयातील बार असोसिएशनच्या कार्यकारी समितीने या घटनेचा निषेध केला आहे. यातील आरोपींचे वकीलपत्र कोणी घेऊ नये, असे आवाहन सदस्यांना केले आहे. यासंबंधीच्या खटल्याची सुनावणी घेऊन लवकरात लवकर न्याय द्यावा, अशी विनंती त्यांनी विशेष न्यायालयाला केली आहे. 

बहुमत चाचणीनंतर अमित शहा आता महाराष्ट्रात!

हैदराबादमधील या घटनेचा निषेध करीत अनू दुबे या युवतीने महिलांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी आज नवी दिल्लीत संसदेबाहेर आंदोलन केले. पोलिसांनी तिला जबरदस्तीने तिथून संसद ठाण्यात नेले. सुमारे चार तास तेथे ठेवून नंतर तिला सोडण्यात आले. हे आंदोलन केवळ हैदराबाद प्रकरणाविरोधात नसून सर्व प्रकारच्या अत्याचाराविरोधात आणि महिलांच्या सुरक्षेसाठी होते, असे तिने सांगितले. 

पोलिसांवर कारवाईची मागणी 

राष्ट्रीय महिला आयोगाने या हत्याकांडाच्या चौकशीसाठी समितीची स्थापना केली आहे. पीडितेच्या वडिलांना मदत देण्यास नकार देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून ट्विटर, फेसबुक अशा सोशल मीडियातून वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोक संताप व्यक्त करीत आहेत. यात केंद्रीय मंत्री हरसिमरतकौर बादल, गजेंद्रसिंह शेखावत, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, बॅडमिंटनपटू साईना नेहवाल आदी महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे. 

प्रियांका रेड्डी बलात्कार प्रकरण; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघड

गृहमंत्र्यांची सारवासारव 

या नृशंस घटनेने वातावरण तापलेले असतानाच तेलंगणचे गृह राज्यमंत्री मोहंमद मोहंमद अली यांनी काल केलेल्या वादग्रस्त विधानाने संतापाची लाट उठली. "पीडितेने तिच्या बहिणीला फोन करण्याऐवजी पोलिसांना फोन करायला हवा होता,' असे विधान त्यांनी केले होते. नंतर त्यांनी याची सारवासारव केली. "पोलिसांना वेळेत माहिती मिळाली असती तर संबंधित मुलीचा जीव वाचला असता, असे मला म्हणायचे होते,' असा खुलासा अली यांनी केला. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र व मंत्री के. टी. रामाराव या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hyderabad Rape Case Peoples Protest on Road 3 Police Suspended