प्रियांका म्हणाली, भिती वाटतेय अन् फोन ऑफ झाला...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

प्रियांका रेड्डीने बहिणीला फोन केला अऩ् म्हणाली मला भिती वाटत आहे. बहिणीसोबत एवढं बोलण झालं आणि तिचा मोबाईल स्विच ऑफ झाला. दुसऱया दिवशी प्रियांकाचा जळालेला मृतदेहच पाहायला मिळाला.

हैदराबाद: प्रियांका रेड्डीने बहिणीला फोन केला अऩ् म्हणाली मला भिती वाटत आहे. बहिणीसोबत एवढं बोलण झालं आणि तिचा मोबाईल स्विच ऑफ झाला. दुसऱया दिवशी प्रियांकाचा जळालेला मृतदेहच पाहायला मिळाला.

पुन्हा 'निर्भया'; हैदराबादमध्ये सामूहिक बलात्कार करून तरुणीला जाळले

डॉक्टर प्रियांका (वय 26) हिची गाडी बुधवारी (ता. 27) रात्री शहराच्या एका भागात पंक्चर झाली. तिने घरी फोन करून तसे कळविले. रात्री बराच उशीर झाल्याने घरच्यांनी तिला सुरक्षित जागेत थांबण्यास सांगितले. पण तिने पंक्चर काढण्यासाठी कुठे गॅरेज आहे का? हे पाहण्यास सुरवात केली. काही मुलांनी मदतीच्या बहाणा करून छेडछाड सुरू केली. शेवटी नको ते झाले.

ट्विटरवर #RIPPriyankaReddy,  #JusticeForPriyankaReddy हे हॅशटॅग ट्रेंड मध्ये आहेत. प्रियांका रेड्डीला न्याय मिळावा यासाठी ही मोहिम सुरु कऱण्यात आली आहे. पशु चिकित्सक असलेल्या प्रियांकाचा जळालेला मृतदेह शादनगर जवळ सापडला. तिच्यावर बलात्कार करून मृतदेह जाळल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. रंगारेड्डी परिसरात स्थानिकांनी प्रियांकाला न्याय मिळावा, अशी मागणी करत कँडल मार्च काढणार असल्याचे सांगितंले.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, प्रियांका कोल्लारु इथे पशु चिकित्सालयात गेली होती. तिने स्कूटी शादनगर टोल प्लाझाजवळ पार्क केली होती. रात्रीच्या वेळी निघताना गाडी पंक्चर झाल्याचे तिला समजले. तेव्हा प्रियांकाने बहिणीला फोन करून गाडी पंक्चर झाल्याचे सांगितले. शिवाय, आपल्याला भीती वाटत असल्याचे बहिणीला सांगितले. त्यावेळी बहिणीने प्रियांकाला टोल प्लाझाला जाऊन तिथून कॅबने येण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा प्रियांकाने कोणीतरी मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले आणि फोन ठेवला. त्यानंतर तिचा फोन स्वीच ऑफ झाला. कुटुंबीयांनी टोल प्लाझाच्या परिसरात प्रियांकाचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. सकाळी शादनगरजवळ तिचा मृतदेह आढळला. तिचे कपडे घटनास्थळापासून काही अंतरावर सापडल्याने बलात्कारानंतर खून झाल्याची शंकाही व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. बुधवारी रात्री एक तरुण प्रियांकाची गाडी घेऊन 9.30 च्या सुमारास आला होता. तरुणाने गाडी त्याच्याकडे सोडली आणि निघून गेला, असे शमसेर आलम नावाच्या गॅरेज चालकाने सांगितले. प्रियांकाच्या खूनाचा उलगडा करण्यासाठी हैदराबाद पोलिस सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करत आहेत. शिवाय प्रियांकाच्या फोनवर कोणाचे कॉल आले याचाही तपास करत आहेत. पोलिस उपायुक्त प्रकाश रेड्डी यांनी सांगितले की, अज्ञात व्यक्तीने प्रियांकाची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह जाळण्यात आला. सध्या याबाबातची पुढील तपास सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hyderabad veterinary doctor priyanka reddy calling sister and mobile swithch off