मीच "सप'चा अध्यक्ष; अखिलेश मुख्यमंत्री

पीटीआय
सोमवार, 9 जानेवारी 2017

मुलायमसिंह यांनी रविवारी शिवपाल यादव यांच्या साथीत सकाळी समाजवादी पक्षाच्या लखनौ येथील मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेतली. कुटुंबात आणि पक्षात सध्या सुरू असलेल्या संघर्षाविषयी विचारले असता, मुलायमसिंह म्हणाले की, आमच्या पक्षात कोणतेही वाद नाहीत

 

नवी दिल्ली / लखनौ - उत्तर प्रदेशच्या राजकारणात निर्माण झालेल्या कौटुंबिक सत्तासंघर्षात समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी, मीच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असून, माझा मुलगा अखिलेश केवळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असल्याचा दावा केला. त्याचप्रमाणे पक्षात कोणतेही मतभेद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना मुलायमसिंह यांनी त्यांचा भाऊ शिवपाल यादव अजूनही उत्तर प्रदेश समाजवादी पक्षाचे अध्यक्ष असल्याचे सांगितले. राज्यसभा खासदार रामगोपाल यादव यांनी या महिन्याच्या सुरवातीला पक्ष सदस्यांची बैठक घेऊन अखिलेश यांना पक्षाचे अध्यक्ष घोषित करताना शिवपाल यादव यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्यात येत असल्याचा प्रस्ताव मांडला होता. याविषयी मुलायम म्हणाले की, रामगोपाल यांनी बोलावलेली बैठक घटनाबाह्य आहे. कारण, त्यापूर्वीच 30 डिसेंबरला त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, मुलायमसिंह यांनी रविवारी शिवपाल यादव यांच्या साथीत सकाळी समाजवादी पक्षाच्या लखनौ येथील मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेतली. कुटुंबात आणि पक्षात सध्या सुरू असलेल्या संघर्षाविषयी विचारले असता, मुलायमसिंह म्हणाले की, आमच्या पक्षात कोणतेही वाद नाहीत.

नंतर शिवपाल यांच्यासह नवी दिल्लीसाठी रवाना झाले. पक्षाच्या सायकल चिन्हावर दावा करण्यासाठी ते निवडणूक आयोगाची भेट घेण्याची शक्‍यता आहे.

मुलायमसिंहांचा गट उद्या (सोमवारी) या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याची शक्‍यता आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना उद्यापर्यंतच कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे.

काल (शनिवारी) अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र दाखल करताना सुमारे 90 टक्के आमदार आणि प्रतिनिधींच्या सह्यांचा दावा केला होता. पक्ष कार्यालयातील मुलायमसिंह यांची खोली बंद अवस्थेत असल्याचे तसेच त्यांच्या आणि शिवपाल यांच्या नावांची पाटी काढण्यात आल्याच्या वृत्तावर स्पष्टीकरण देताना समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (अखिलेश गट) नरेश उत्तम यांनी त्यांच्या नावांच्या पाट्या कधीच काढल्या नसल्याचे सांगितले.

Web Title: I’m still the boss, asserts Mulayam