रामनाथ कोविंद देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथबद्ध

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 जुलै 2017

मी अत्यंत साध्या पार्श्‍वभूमीमधून येथपर्यंत आलो आहे; आणि माझा हा प्रवास दीर्घ झाला आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ ए पी जे अब्दुल कलाम आणि प्रणवदांसारख्या व्यक्तिमत्त्वांनी जे पद भूषविले; त्याच मार्गावर चालण्याची संधी मिळणे, हा माझा बहुमान आहे

नवी दिल्ली - "राष्ट्रीय लोकशाही आघाडी'च्या (एनडीए) रामनाथ कोविंद यांनी आज (मंगळवार) संसदेच्या ऐतिहासिक "सेंट्रल हॉल'मध्ये भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप राष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते यावेळी सभागृहात उपस्थित होते. कोविंद यांना सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या हस्ते शपथ देण्यात आली.

"भारताचे राष्ट्रपतीपद मी अत्यंत नम्रतेने स्वीकारत आहे. ही जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आल्याबद्दल मी सर्वांचा अत्यंत ऋणी आहे. मी अत्यंत साध्या पार्श्‍वभूमीमधून येथपर्यंत आलो आहे; आणि माझा हा प्रवास दीर्घ झाला आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ ए पी जे अब्दुल कलाम आणि प्रणवदांसारख्या व्यक्तिमत्त्वांनी जे पद भूषविले; त्याच मार्गावर चालण्याची संधी मिळणे, हा माझा बहुमान आहे,' अशी भावना कोविंद यांनी यावेळी व्यक्त केली.

""एक राष्ट्र म्हणून आत्तापर्यंत आपण खूप काही मिळविले आहे; अजून प्रगती करण्यासाठी आपण प्रयत्नशील असावयास हवे. आपण सर्व एक आहोत व एकच राहू,'' असे राष्ट्रपती म्हणाले. राष्ट्रपतीपदाच्या शपथग्रहणावेळी कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप राष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, न्यायमूर्ती खेहर यांना धन्यवाद दिले. आपल्या छोटेखानी भाषणात राष्ट्रपतींनी "डिजिटल इंडिया' योजनेचाही अल्प उल्लेख केला. याचबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही स्मरण राष्ट्रपतींकडून या वेळी करण्यात आले.

बिहारच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळलेल्या कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयामध्ये 16 वर्षे वकिली केली आहे. याशिवाय कोविंद यांची राज्यसभा सदस्य म्हणूनही दोनदा निवड झाली आहे.

Web Title: 'I am accepting this position with all humility,' says President Kovind