'मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मीच"

अवित बगळे
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

गोव्यातील राजकीय इतिहासात नव्या अध्यायाची सुरवात

पणजी- मुख्यमंत्रीपदाचा आपण उमेदवार आहे असे सांगून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रांत संघचालक सुभाष वेलिंगकर यांनी राजकीय चर्चेला पूर्णविराम दिला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर आणि केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक आदींचा राजकीय प्रवास सुरु करणारे वेलिंगकर यांनी गोवा सुरक्षा मंच या राजकीय पक्षात प्रवेश केला.

यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, भाजपला गोव्यात सत्तेवर आणण्यासाठी मला दहा वर्षे लागली मात्र आता राजकीय वातावरण अनुकूल असल्याने गोवा सुरक्षा मंच येत्या पाच वर्षांत गोव्यात सत्तेवर येईल.

''मोबाईलवर बातम्या वाचण्यासाठी सकाळचे अॅप डाऊनलोड करा''

इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना अनुदान देण्यावरुन तत्कालीन कॉंग्रेसच्या सरकारविरोधात त्यांनी भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या माध्यमातून आंदोलन केले आणि कॉंग्रेसचे सरकार 2012 मध्ये घालवले. भाजपच्या सरकारनेही त्यानंतर अनुदान बंद न केल्याने त्यांनी 2017 मध्ये गोवा सुरक्षा मंच हा पक्ष स्थापन करून भाजपला विरोध केला. त्यामुळे भाजपची आमदार संख्या 21 वरून 13 वर आली‌ असल्याचेही त्यांनी सांगितले.

समाजकारणात असो वा राजकारण यांत जनशक्तीचा वरचष्मा हवा. सरकारने इंग्रजी प्राथमिक शाळांना अनुदान देण्याचा निर्णय जनभावनांची कदर न करता घेतला. त्यामुळे आम्हाला भारतीय भाषा सुरक्षा मंच स्थापन करून आंदोलन करावे लागले. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही कॉंग्रेसच्या विरोधात होतो. त्यावेळी भाजपकडे आम्ही पर्याय म्हणून पाहत होतो. जनतेने भाजपला 21 जागांचे स्पष्ट बहुमत दिले. मात्र अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करण्याच्या नादात भाजपचे नेते आम्हाला दिलेले आश्‍वासन विसरले. त्यामुळे 2017 च्या निवडणुकीदरम्यान आम्हाला सत्ताधारी भाजपविरोधी भूमिका घ्यावी लागली. परिणामी भाजपचे आमदार 21 वरून 13 झाले. विधानसभा निवडणुकीला 15 दिवस असताना गोवा सुरक्षा मंच हा राजकीय पर्याय निर्माण करावा लागला. आमच्या समस्या म्हणजे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी राजकारण हे आमच्यासाठी असे अपरिहार्य झाले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

भाजपने विश्‍वासघात केला म्हणून त्यांच्यावर आमचा राग आहे. कॉंग्रेसने देशाची पुरती वाट लावली, या विचारांवर आम्ही आजही ठाम आहोत. भाजपला विरोध म्हणजे कॉंग्रेसशी जवळीक असे आमचे राजकारण नाही. आमचे हे तत्त्वांचे राजकारण आहे. भाजप जनतेच्या भावनांशी खेळला. त्यामुळे आता सक्षम पर्याय आम्ही गोवा सुरक्षा मंचाच्या रूपाने उभा केला आहे. आमचे लक्ष्य भाजपच असेल असे म्हणणे आता चुकीचे ठरेल. आमच्या विरोधातील पक्ष हे आमचे लक्ष्य असतील. आम्ही राजकारणातील वैचारिक दिवाळखोरी आणखीन चालवून घेऊ शकत नसल्याचेही वेलिंगकर यांनी यावेळी सांगितले.

Web Title: I Am also Chief Ministers face