I am failure... लिहून 15 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 मार्च 2018

या विद्यार्थिनीच्या पालकांनी दोन शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. हे दोघेही विज्ञान आणि समाजशास्त्र हा विषय शिकवत आहेत. या दोन शिक्षकांनी तिचा लैंगिक छळ केला आणि त्यानंतर त्यांनी तिला वार्षिक परिक्षेत नापास केले होते. त्यामुळे तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. 

नवी दिल्ली : नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. 'आय एम फेल्युअर' (मी अपयशी आहे) असे लिहित या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी शाळेतीलच दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Suicide Note

दिल्लीतील नोएडा येथील 15 वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी शाळेतील दोन शिक्षकांवर लैंगिक छळवणूक केल्याचा आरोप केला. या शिक्षकांनी तिला जाणूनबुजून वार्षिक परीक्षेत नापास केले होते. त्यामुळे ती अत्यंत निराश होती. या नैराश्येतूनच तिने आत्महत्या केली, असे तिच्या पालकांनी सांगितले. आत्महत्या करताना तिने एक चिठ्ठी लिहिली होती, या चिठ्ठीमध्ये तिने 'आय एम फेल्यूअर' (मी अपयशी आहे) असे तिने लिहिले. पोलिस आणि विद्यार्थिनीच्या पालकांनी चिठ्ठीमधील हस्ताक्षर विद्यार्थिनीचेच असल्याचे तपासले आहे.

तसेच ''मी मुकी आहे, मला स्वत:चा तिरस्कार होत आहे, मी अपयशी आहे'', असे तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सांगितले. या चिठ्ठीतील स्वाक्षरीही तिची असल्याचे स्पष्ट झाले आहे. या विद्यार्थिनीच्या पालकांनी दोन शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. हे दोघेही विज्ञान आणि समाजशास्त्र हा विषय शिकवत आहेत. या दोन शिक्षकांनी तिचा लैंगिक छळ केला आणि त्यानंतर त्यांनी तिला वार्षिक परिक्षेत नापास केले होते. त्यामुळे तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. 

दरम्यान, ''तिच्या वडिलांनी या दोन्ही शिक्षकांवर आपल्या मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला. तसेच तिला नापासही केले. त्यांच्या या तक्रारीवरून संबंधित शिक्षकांविरोधात 'बाल लैंगिक अत्याचारविरोधी कायद्यां'तर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु करण्यात आला आहे'', असे नोएडाचे शहर पोलिस अधीक्षक अरूण के. सिंग यांनी सांगितले. 

Web Title: I Am Failure written by Schoolgirl Who Complained Of Sex Abuse Wrote In Notebook 15 years Suicide