'पीएम' व्हायचंय मला!

पीटीआय
बुधवार, 9 मे 2018

काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला, तर मी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारेन, नरेंद्र मोदी हे कोणत्याही स्थितीमध्ये पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

बंगळूर - आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला, तर आपण पंतप्रधान व्हायला तयार आहोत, असे प्रतिपादन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथे बोलताना केले. सत्तेचे हे समीकरण काँग्रेसच्या कामगिरीवर अवलंबून असेल. काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला, तर मी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारेन, नरेंद्र मोदी हे कोणत्याही स्थितीमध्ये पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. ते येथे 'समृद्ध भारत फाउंडेशन'च्या उद्‌घाटन समारंभासाठी आले होते. काँग्रेस अन्य पक्षांशी आघाडी करून मैदानामध्ये उतरला, तर भाजप विजयी होण्याची शक्‍यता कमीच आहे. विरोधकांच्या ऐक्‍यामुळे भाजपला पुन्हा सत्तेत येणे शक्‍य होणार नाही, राजस्थान आणि छत्तीसगडमधील निवडणूक आम्ही सहज जिंकू, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

लोकशाही मूल्यांचा प्रचार 
उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम 'समृद्ध भारत फाउंडेशन'च्या माध्यमातून केले जाणार आहे. या संस्थेच्या विश्‍वस्त मंडळामध्ये ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्‍याम बेनेगल आणि सर्वोच्च न्यायालयातील आघाडीचे विधिज्ञ के. टी. एस. तुलसी यांचा समावेश आहे. 

राहुल यांचा उपरोधिक टोला 
राहुल गांधी यांनी मंगळवारी ट्विटरवरुन पंतप्रधानांच्या नावे उपरोधिक प्रतिक्रिया देत सरकारवर टीका केली. 'प्रिय अर्थमंत्री, आपण आजारी आहात, अर्थ सचिव आत्मिक शांतीसाठी त्यांच्या गुरुकडे गेले आहेत, यामुळेच अर्थ मंत्रालय पुढील आदेश येईपर्यंत बंद राहील. 'पीएमओ'च पूर्वीप्रमाणे सगळे अर्थविषयक निर्णय घेईल,' असे राहुल यांनी म्हटले आहे.

'राहुल यांना पंतप्रधान बनल्याची स्वप्ने पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे. राहुल काँग्रेसचे उपाध्यक्ष बनल्यानंतर त्यांच्याच पक्षाने तेरा राज्ये गमावली आहेत.' - शहानवाझ हुसैन, भाजप प्रवक्ते 

राहुल म्हणाले...

  • रा. स्व. संघ, 'मुस्लिम ब्रदरहुड' सारखेच
  • सर्व संस्थांवर कब्जा करण्याचा संघाचा डाव 
  • भाजपने गांधी, पटेलांचा वारसा नष्ट केला
  • अमित शहा हे खूनी प्रकरणातील आरोपी
Web Title: I am ready to be a prime minister says congress president rahul gandhi