अण्णा म्हणतात, आता बंदूक नाही उचलणार; पण ट्रक नक्की चालवेन!

Anna Hazare
Anna Hazare

मुंबई : 'माझं वय झालंय.. त्यामुळे आता बंदूक तर उचलू शकत नाही; पण गरज भासली, तर शत्रूशी लढणाऱ्या आपल्या लष्कराला मदत पोचविण्यासाठी मी प्रसंगी ट्रकही चालवेन', अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काल (शुक्रवार) व्यक्त केली. काश्‍मीरमधील पुलवामा येथे 'जैश ए महंमद'च्या दहशतवाद्याने 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या जवानांवर आत्मघाती हल्ला केला. त्यात 44 जवान हुतात्मा झाले. 

यासंदर्भात अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. उपोषणानंतर तब्येत खालावल्यामुळे अण्णा हजारे सध्या रुग्णालयात आहेत. तेथूनच अण्णांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले. अण्णा हजारे यापूर्वी लष्करात होते. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये त्यांनी लष्करात सेवा केली होती. 

गुरुवारी झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जवान हुतात्मा झाले आहेत. या जवानांच्या कुटुंबीयांची पूर्ण जबाबदारी राज्य सरकार उचलणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनीच या हल्ल्याचा वचपा काढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

'या हल्ल्यानंतर सीआरपीएफमध्ये चीड निर्माण झाली आहे. आम्ही सुरक्षा यंत्रणांना पूर्णपणे सूट दिली आहे. पुलवामाच्या गुन्हेगारांना कधी, कुठे आणि कशी शिक्षा करायची, हे आपले लष्करच ठरवेल', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) यवतमाळमध्ये सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com