मंत्रीपद कसे मिळवायचे हे माझ्याकडून शिका : आठवले

वृत्तसंस्था
सोमवार, 10 जून 2019

मी, ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो; ना भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना. तरीदेखील मला थेट मंत्रिपद मिळाले आहे.

नवी दिल्ली : मी, ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो; ना भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना. तरीदेखील मला थेट मंत्रिपद मिळाले आहे. मंत्रीपद कसे मिळवायचे हे माझ्याकडून शिकावे, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज (सोमवार) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाने लोकसभा निवडणुकीत कोणतीही जागा लढवली नव्हती. आपल्या पक्षाला एकतरी जागा मिळावी यासाठी आठवले यांनी मागणी केली होती. मात्र, जागा मिळाली नव्हती. तरी सुद्धा आठवले यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. यावर पत्रकारांशी बोलताना मंत्रीपद कसे मिळवायचे हे माझ्याकडून शिकावे, असे म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची काही दिवसांपुर्वी भेट झाली होती. यावेळी राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. यानंतर दोघांनीही हे वृत्त फेटाळले होते. यावर बोलताना आठवले म्हणाले, 'शरद पवार यांनी यापुढे काँग्रेस सोबत राहू नये. त्यांनी आता एनडीए मध्ये यावे. शरद पवार यांची पॉवर काँग्रेस पेक्षा जास्त आहे. मी इथे आहे तर पवार साहेबांचं तिथे काय काम आहे?'

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे विजयी खासदार अयोध्येत गेल्याने राम मंदीर होणार नाही, असे आठवले म्हणाले होते. अयोध्येत राम मंदिर व्हायला पाहिजे असे माझे देखील मत आहे, पण ते मंदिर कायदेशीर असावे आठवलेंनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: i didnt meet narendra modi or amit shah still i manage to get cabinate says ramdas aathawale