ABVP कडून बलात्काराच्या धमक्या- जवानाची मुलगी

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

या पोस्टनंतर सोशल मिडीयावरून मला धमक्या देण्यात येत आहे. राहुल नावाच्या एका युवकाने मला फोन करून बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. मला धमक्या देण्याबरोबरच देशद्रोही ठरविण्यात येत आहे.

नवी दिल्ली - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला (अभाविप) मी घाबरत नाही, असे सोशल मिडीयावरून सांगणाऱ्या गुरमेहर कौर हिने आता आपल्याला अभाविपकडून बलात्कार करण्याच्या धमक्या येत असल्याचे म्हटले आहे.

दिल्ली विद्यापीठाच्या रामजास महाविद्यालयात बुधवारी (ता. 22) अभाविप आणि डाव्या विचारसरणीच्या "ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन'च्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कारगिलमधील हुतात्मा कॅप्टन मनदीप सिंह यांची मुलगी गुरमेहर कौर हिने सोशल मीडियावर "अभाविपला मी घाबरत नाही' असा प्रचार सुरू केला. तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. 'जेएनयू'मधील विद्यार्थी उमर खालिद आणि शेहला मसूद यांना चर्चासत्रासाठी आमंत्रित करण्यावरून तणाव निर्माण झाला होता. 

गुरमेहर कौर हिने, मी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. 'अभाविप'ला मी घाबरत नाही. मी एकटी नाही तर देशातील प्रत्येक विद्यार्थी माझ्याबरोबर आहे,'' अशा मजकुराचा फलक हातात धरलेले छायाचित्र फेसबुकवर पोस्ट केले. 'स्टुडंट्‌स अग्नेस्ट एबीव्हीपी' या शीर्षकाखाली तिने सोशल मीडियावर प्रचार मोहीम सुरू केली होती. ही पोस्ट मोठ्याप्रमाणावर सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती.

आता या पोस्टनंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना गुरमेहर कौरने सांगितले, की या पोस्टनंतर सोशल मिडीयावरून मला धमक्या देण्यात येत आहे. राहुल नावाच्या एका युवकाने मला फोन करून बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. मला धमक्या देण्याबरोबरच देशद्रोही ठरविण्यात येत आहे. त्यामुळे मला खूप भिती वाटत आहे.

Web Title: I Got Rape Threats For Calling Out ABVP, Says Kargil Martyr's Daughter