माझ्याकडे जरा जास्तच राजकीय इच्छाशक्ती: मोदी

वृत्तसंस्था
शनिवार, 22 एप्रिल 2017

"अधिकाऱ्यांनी प्रामाणिक हेतूने निर्णय घेतला आणि त्याचा फायदा लोकांच्या कल्याणासाठी होणार असेल तर जगातील कोणीही तुमच्याकडे बोट दाखवू शकणार नाही.''
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

नवी दिल्ली: "सुधारणा घडविण्यासाठी माझ्याकडे जरा जास्तच राजकीय इच्छाशक्ती आहे. त्यामुळे नोकरशाहीने वर वर काम न करता देशात बदल घडविण्यासाठी एकत्रितपणे सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत,'' असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.

"सिव्हिल सर्व्हिस डे'निमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रशासकीय अधिकाऱ्यांपुढे बोलत होते. मोदी म्हणाले, ""जनहिताच्या दृष्टीने प्रामाणिक निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आहे. त्यामुळे परिणामांची तमा न बाळगता झटपट निर्णय घेण्यास अजिबात घाबरू नका. राजकीय इच्छाशक्तीमुळे सुधारणा घडतील; पण नोकरशाहीच्या कामगिरीने व लोकांच्या सहभागामुळेच खरा बदल घडेल. आपल्याला हे सारे तिन्ही घटक एका सुरात आणावे लागतील, तरच त्याचे उत्तम परिणाम दिसू लागतील. सुधारणांसाठी राजकीय इच्छाशक्ती असण्याची गरज असते. माझ्यात त्याची कमतरता नाही. किंबहुना माझ्यात ती काकणभर जास्तच आहे.''

महालेखापाल (कॅग), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) या तीन "सीं'मुळे निर्णयप्रक्रियेत अडथळे येतात आणि धोरण लकवा निर्माण होतो, असा तक्रारींचा सूर काही अधिकाऱ्यांनी लावला होता. त्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना आश्‍वस्त केले.

ते म्हणाले, ""अधिकाऱ्यांनी आपल्या निर्णयांकडे आकड्यांच्या नजरेने पाहू नये. आकड्यांनी कधी बदल घडतो का? किती निर्णय घेतले, यापेक्षा घेतलेल्या निर्णयांचा परिणाम काय झाला हे पाहणे फार महत्त्वाचे आहे. लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी चौकटीबाहेर जाऊन विचार करीत उत्तरे शोधावी लागतील. तुम्ही तुमची कामाची व विचार करण्याची पद्धत बदललीत तर कधीही चांगलेच आहे. तुम्ही नियंत्रक म्हणून भूमिका न बजावता त्यातून बाहेर आलात की मग आव्हानांचे संधीत रूपांतर होते. भारताला 2022 मध्ये "सुपर पॉवर' कसे बनविता येईल, या दिशेने विचार करून प्रत्येकाने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे.''

Web Title: I have a lot more political will: Modi