मी शेतकर्‍यांच्या पाठीशीच; रविना टंडनचा खुलासा

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जून 2018

''ही एक दुर्दैवी बाब आहे. विरोध करण्याचा हा भयानक प्रकार आहे. अशा लोकांना विनाजामिन अटक करायला हवी''.

- रविना टंडन, अभिनेत्री

मुंबई : कर्जमाफी, योग्य भाव आणि इतर मागण्यांसाठी देशभरातील शेतकऱ्यांनी दहा दिवसांचे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या पद्धतीबाबत अभिनेत्री रविना टंडन हिने नाराजी व्यक्त करत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना अटक करण्याची आवश्‍यकता असल्याचे मत व्यक्त केल्यानंतर तिच्यावर काही नेटिझन्सनी टीका केली.

"किती दुर्दैवी घटना घडत आहे. निदर्शनाची किती भयानक पद्धत आहे. सार्वजनिक मालमत्ता, वाहतूक आणि सेवा-सुविधांचे नुकसान करणाऱ्यांना तातडीने अटक करून विनाजामीन तुरुंगात टाकायला हवे,' असे ट्‌वीट रविनाने शनिवारी (ता. 2) केले होते.

शेतमालाची नासाडी करण्याऐवजी त्याचा सदुपयोग करण्याचा सल्लाही तिने दिला होता. यावर काही जणांनी ती शेतकऱ्यांची थट्टा करत असल्याची टीका केली. मात्र, आपण शेतकऱ्यांची कोणतीही थट्टा केली नसल्याचे तिने स्पष्ट केले. टीका करणाऱ्यांनी ट्‌वीट पूर्ण वाचून मगच प्रतिक्रिया द्यावी, असेही तिने सांगितले. "मी नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने असून, त्यांच्या सर्व समस्या सुटाव्यात, अशी प्रार्थना करत असते. मी केवळ निदर्शकांनी अन्न फेकून देऊ नये, गरिबांना वाटावे, अशी विनंती केली होती,' असेही तिने निदर्शनास आणून दिले.

 

Web Title: I support farmers agitation says Raveena Tandon