...तर रेल्वेस्थानकावर खाद्यपदार्थ मिळणार फुकट!

सकाळ न्यूज नेटवर्क 
गुरुवार, 18 जुलै 2019

- रेल्वे तांबलेली असताना धावतपळत जाऊन खाद्यपदार्थ, चहा-कॉफी, किंवा पाण्याची बाटली घेतल्यावर तुम्हाला संबंधित विक्रेत्याने त्याचे बिल दिले नाही तर त्याचे पैसेही देऊ नका, ते पदार्थ सरळ फुकट घेऊन जा.

नवी दिल्ली : रेल्वे तांबलेली असताना धावतपळत जाऊन खाद्यपदार्थ, चहा-कॉफी, किंवा पाण्याची बाटली घेतल्यावर तुम्हाला संबंधित विक्रेत्याने त्याचे बिल दिले नाही तर त्याचे पैसेही देऊ नका, ते पदार्थ सरळ फुकट घेऊन जा, असे निर्देश रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी आज दिले आहेत.

देशभरातील तब्बल 8 हजार रेल्वेस्थानकांवरील हजारो खाद्यपदार्थ विक्रेते असे बिल वेळेत देतील का?तसे ते दिले नाही तर त्यांच्यावर कोणती कारवाई रेल्वे करणार ? बिल घेण्याच्या नादात एखाद्याची गाडीच सुटली तर ? यासारखे प्रश्‍न गोयल यांच्या मंत्रालयाने अनुत्तरितच सोडून दिल्याचे दिसत आहे. 
गोयल यांनी आज दुपारी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना वरील निर्णयाची माहिती दिली. अनेक रेल्वेस्थानकांवर मनमानी पध्दतीने खाद्यपदार्थांची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी मंत्रालयाकडे आल्यावर रेल्वेमंत्र्यांनी वरील निर्णयाची घोषणा केली आहे. यामुळे पारदर्शकता वाढेल असे रेल्वेचे म्हणणे आहे. 

रेल्वेस्थानकांवरील बहुतेक सर्व खाद्यपदार्थ विक्रेते सध्या बिल देत नाहीत ; किंबहुना वेळेच्या अभावी एक नजर गाडीकडे लागलेले घाईघाईतील प्रवासीच ते मागत नाहीत असा सार्वत्रिक अनुभव आहे. साहजिकच रेल नीरच्या पाण्याची बाटलीही एखाद्या स्थानकावर पंधरा रूपयांना तर दुसरीकडे वीस-पंचवीस रूपयांना, असेही चित्र सर्रास दिसते. गोयल यांच्या "नो बिल नो पेमेंट' या नव्या धोरणानुसार पाच-दहा रूपयांचा वडापाव असला तरी त्या विक्रेत्याला त्याचे बिल देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

बिल न दिल्याने पैसे देण्याचे एखाद्या प्रवाशाने नाकारले तर वादाचे प्रसंगही उद्भवू शकतात. वाढीव बिल दिल्यावर वीस-तीस रूपयांसाठी त्यांच्याशी कोण वाद घालणार अशी सर्वसामान्य भूमिका प्रवाशांची असते. शिवाय धावत्या रेल्वेगाड्यांमध्ये येणाऱ्यांकडून कसे बिल मागमार ? यासारखे अनेक प्रश्‍न अनुत्तरितच राहिल्याची प्रतीक्रिया उमटत आहे. गोयल यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नवा नियम सोप्या पध्दतीने समजावून सांगण्यात आला आहे. बिल नाही तर पैसे नाहीत, हे धोरण "प्रॅक्‍टीकली' अंमलात येऊ शकते काय, हा खरा प्रश्‍न आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If Bill is not Given then Food will be Free in Rail Station