राममंदिराचा प्रश्‍न न्यायालयानेच मिटवावा : स्वामी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

अलाहाबाद उच्च न्यायालयातील लढाई आम्ही जिंकली असून, न्यायालयानेच तेथे रामाचा जन्म झाल्याचे मान्य केले आहे. तुम्ही जर हिंदू- मुस्लिम ऐक्‍याच्या गोष्टी करत असाल, तर मशीद कोठेही उभारली जाऊ शकते; पण जेथे रामाचे मंदिर होते, तेथे मात्र ही वास्तू बांधता येणार नाही.

लखनौ - अयोध्येतील राममंदिराच्या मुद्द्यावर मुस्लिमांना जर तडजोड करायची नसेल, तर न्यायालयानेच या प्रकरणात हस्तक्षेप करत हा प्रश्‍न मार्गी लावावा, असे भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयातील लढाई आम्ही जिंकली असून, न्यायालयानेच तेथे रामाचा जन्म झाल्याचे मान्य केले आहे. तुम्ही जर हिंदू- मुस्लिम ऐक्‍याच्या गोष्टी करत असाल, तर मशीद कोठेही उभारली जाऊ शकते; पण जेथे रामाचे मंदिर होते, तेथे मात्र ही वास्तू बांधता येणार नाही, असेही स्वामी यांनी नमूद केले. स्वामी यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. 

स्वामी यांच्या वक्तव्याबाबत बाबरी मशीद कृती समितीचे समन्वयक झाफरयाब जिलानी म्हणाले की, "सुब्रह्मण्यम स्वामी यांनी मुस्लिमांना धमकी देऊ नये. मुस्लिमांचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्‍वास असून, आम्ही कायद्याला बांधील आहोत.'' मध्यंतरी स्वामी यांनीच अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उभारणीस मुस्लिमांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले होते. 

Web Title: If no compromise, court shall resolve Ram Temple issue: Subramanian Swamy