भारतात उत्पादन केल्यास शेकडो विमाने घेऊ

वृत्तसंस्था
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - स्थानिक कंपनीबरोबर भागीदारी करून भारतामध्ये उत्पादन केल्यास विदेशी कंपन्यांकडून शेकडो लढाऊ विमाने खरेदी करण्यास आम्ही तयार आहोत, असा प्रस्ताव भारत सरकारने ठेवला असल्याचे हवाई दलाने आज सांगितले.

नवी दिल्ली - स्थानिक कंपनीबरोबर भागीदारी करून भारतामध्ये उत्पादन केल्यास विदेशी कंपन्यांकडून शेकडो लढाऊ विमाने खरेदी करण्यास आम्ही तयार आहोत, असा प्रस्ताव भारत सरकारने ठेवला असल्याचे हवाई दलाने आज सांगितले.
सुमारे दोनशे लढाऊ विमाने घेण्याची भारताची तयारी असून, ही संख्या तीनशेपर्यंतही जाऊ शकते. यासाठी 13 ते 15 अब्ज डॉलर खर्च अपेक्षित आहे. अत्याधुनिक राफेल विमाने खरेदीचा करार भारताने नुकताच केला असला, तरी केवळ 36 विमाने घेण्यात आली आहेत. त्यामुळेच लढाऊ विमानांची कमतरता भरून काढण्यासाठी नव्याने खरेदी प्रक्रिया सुरू करण्याचा भारताचा विचार आहे. चीन आणि पाकिस्तानबरोबर तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर या प्रक्रियेला वेग येण्याची शक्‍यता आहे.
लढाऊ विमानांची गरज भागविण्याबरोबरच भारतातच विमाननिर्मिती उद्योग सुरू व्हावा, असा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याने विदेशी कंपन्यांनी भारतीय कंपनीबरोबर भागीदारी करत भारतातच उत्पादन केल्यास मोठ्या संख्येने विमान खरेदी करण्यासाठी तयार असल्याचे भारत सरकारने सांगितले आहे. देशांतर्गत उत्पादन सुरू झाल्यास आयातीवर होणारा प्रचंड खर्चही वाचविण्याचा सरकारचा इरादा आहे. संरक्षण मंत्रालयाने याबाबत अनेक विदेशी कंपन्यांकडे प्रस्ताव पाठविले आहेत. या कंपन्यांनी काही प्रमाणात तंत्रज्ञानही हस्तांतरित करावे, असे सरकारचे प्रयत्न आहेत.

विदेशी कंपन्या उत्सुक
भारताच्या या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. एफ-16 विमानाचे उत्पादन करणाऱ्या लॉकहिड मार्टिन या कंपनीने भारतात निर्मिती करण्याची तयारी दर्शविली असून, येथे विमान उत्पादन करून भारतीय लष्करालाच नव्हे, तर इतर देशांनाही विमानविक्री करण्यात त्यांना रस आहे. स्वीडनच्या साब या कंपनीनेही त्यांच्या ग्रिपेन विमानाचे भारतात उत्पादन करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.

Web Title: If produced in India then purchase too may Airoplanes