48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे गोव्यात उद्‌घाटन

अवित बगळे
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

या महोत्सवात 82  देशांचे 195 चित्रपट दाखवण्यात येणार असून 10 चित्रपटांचा जागतिक प्रिमिअर होणार आहे. 10 आशियाई आणि आंतरराष्ट्रीय प्रिमिअर तसेच 64 पेक्षा अधिक भारतीय प्रिमिअर या महोत्सवाचा भाग असतील

पणजी - भारत ही सण, उत्सव, सळसळता युवा वर्ग आणि कहाण्यांची भूमी आहे, इथे सोळाशेहून अधिक बोली भाषांमध्ये कहाण्या सांगितल्या जातात, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री, वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी यांनी येथे नमूद केले. गोव्यात 48व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटन समारंभात त्या आज बोलत होत्या.

जगभरातल्या चित्रपट निर्मात्यांना भारतात आमंत्रित करणे हे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्दिष्ट असल्याचे सांगून, या महोत्सवामुळे चित्रपट प्रेमींना भारतीय चित्रपट उद्योगातल्या प्रथितयश आणि नावाजलेल्या मान्यवरांना भेटण्याची संधी मिळेल असे त्या म्हणाल्या.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी इफ्फी 2017च्या सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले. 2019 मध्ये 50व्या इफ्फी महोत्सवाचा यजमान म्हणून गोवा सज्ज राहील, असे ते म्हणाले. गेल्या काही वर्षात गोव्यामध्ये उत्कृष्ट चित्रपट संस्कृती विकसित झाली असून, गोव्यामध्ये चित्रपट उद्योग विकसित करण्याचे कार्य सुरुच राहील, असे ते म्हणाले. 

या आधी चित्रपट अभिनेते शाहरुख खान यांनी चित्रपट निर्माते आणि इफ्फी 2017च्या प्रतिनिधींचे स्वागत केले. एखादी कल्पना शेकडो लोकांच्या मदतीने सत्यात उतरवणे म्हणजे चित्रपट असे ते म्हणाले. कथा सांगणारा आणि ऐकणारा हे एखाद्या कुटुंबाप्रमाणे असून, सगळ्यांना खिळवून ठेवण्याची ताकद कथेत असते, असे ते म्हणाले.

इफ्फी 2017 च्या उद्‌घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन राजकुमार राव आणि राधिका आपटे यांनी केले. ए.आर.रेहमान, श्रीदेवी, नाना पाटेकर, शाहीद कपूर, यासारख्या भारतीय चित्रपट उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वृद्धिंगत झाली. देशभरातल्या तालवाद्यांचा ‘ड्रम्स ऑफ इंडिया’ आणि ‘उत्सव’ या भारतीय संस्कृतीच्या वैविध्याचे दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

48व्या इफ्फीमध्ये रेट्रोस्पेक्टीव्ह, ब्रिक्स पारितोषिक विजेते चित्रपट, श्रद्धांजली आणि गेल्या काही वर्षातले उत्कृष्ट भारतीय चित्रपटांचा इंडियन पॅनोरमा या विभागात चित्रपट सादर केले जाणार आहेत. सर्जनशील युवकांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मंच मिळावा हा या मागचा उद्देश आहे.

या महोत्सवात 82  देशांचे 195 चित्रपट दाखवण्यात येणार असून 10 चित्रपटांचा जागतिक प्रिमिअर होणार आहे. 10 आशियाई आणि आंतरराष्ट्रीय प्रिमिअर तसेच 64 पेक्षा अधिक भारतीय प्रिमिअर या महोत्सवाचा भाग असतील.

यावर्षीच्या 15 सर्वोत्तम चित्रपटांमध्ये सुवर्ण आणि रौप्य मयूर पुरस्कारासाठी चुरस असेल. आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षकांचे नेतृत्व प्रसिद्ध दिग्दर्शक मुझफ्फर अली करणार असून ऑस्ट्रेलियाचे महोत्सव दिग्दर्शक मॅक्सिन विलियम्सन, इस्रायलचे अभिनेते-दिग्दर्शक झाही ग्राड,रशियन छायाचित्रकार व्लादिस्लाव ओपेलिएनटस, इंग्लंडचे प्रोडक्शन डिझायनर रॉजर ख्रिस्तियन हे अन्य ज्युरी सदस्य असतील.

प्रसिद्ध इराणी चित्रपट दिग्दर्शक माजिद माजिदी यांचा भारतात बनवलेला पहिला चित्रपट ‘बियाँड द क्लाऊड्स’ या चित्रपटाने उद्‌घाटनपर सत्राची आज सुरुवात झाली. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांचे जीवन केंद्रस्थानी ठेवून, पाबेलो सिझर यांनी निर्मिलेला भारत-अर्जेंटिना यांची सहनिर्मिती असलेला ‘थिंकींग ऑफ हीम’ या चित्रपटाने यंदाच्या इफ्फीचा समारोप होईल.

इफ्फी 2017 मध्ये अनेक गोष्टी प्रथमच होत असून चित्रपटांमधील सर्वाधिक लोकप्रिय हेरगिरीपट जेम्स बॉंडचा विशेष विभाग असेल. 1962 ते 2012 पर्यंत आघाडीच्या अभिनेत्यांनी रंगवलेल्या बॉण्डच्या व्यक्तिरेखांचे चित्रपट दाखवले जाणार आहेत. या महोत्सवात टोरँटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने निवडलेल्या कॅनडामधील चित्रपटांवर विशेष भर राहणार आहे.

दिवंगत चित्रपट अभिनेते ओम पुरी, विनोद खन्ना, टॉम ऑल्टर, रिमा लागू, जयललिता, दिग्दर्शक अब्दुल माजिद, कुंदन शहा, दासारी नारायण राव आणि सिनेमेटोग्राफर रामानंद सेन गुप्ता यांच्या चित्रकृती श्रद्धांजली विभागात दाखवल्या जाणार आहेत.

ब्रिक्स विभागात ब्रिक्सअंतर्गत सात पारितोषिक विजेते चित्रपटही इफ्फी 2017 मध्ये रसिकांना पाहता येतील. ॲसेसेबल इंडिया कॅम्पेन अंतर्गत, दृष्टिहिनांसाठी ध्वनी माध्यमातून चित्रपटाचा आनंद घेता येईल, असे दोन चित्रपट दाखवण्यात येतील. इंडियन पॅनोरमा 2017 मध्ये कथापट आणि अनुबोधपट अशा दोन विभागातले चित्रपट राहतील. इंडियन पॅनोरमामध्ये विनोद काप्री दिग्दर्शित ‘पिहू’ चित्रपटाने कथापटांचे उद्‌घाटन होईल, तर कमल स्वरुप यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पुष्कर पूरन’ या चित्रपटाने अनुबोधपट विभागाची सुरुवात होईल.

Web Title: iffi goa smriti irani