देशभरातून डॉक्‍टरांचा संपाला पाठिंबा; चौथ्या दिवशीही आरोग्य सेवा विस्कळित

देशभरातून डॉक्‍टरांचा संपाला पाठिंबा; चौथ्या दिवशीही आरोग्य सेवा विस्कळित

नवी दिल्ली ः पश्‍चिम बंगालमधील सरकारी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांनी चार दिवसांपासून केलेल्या संपावर शुक्रवारीही तोडगा न निघाल्याने राज्यातील आरोग्यसेवा विस्कळित झाली आहे. "एआयआयएमएस' व "भारतीय वैद्यक परिषद' (आयएमए) या डॉक्‍टरांच्या संघटनांनी या संपाला पाठिंबा दिल्याने याचे पडसाद देशभर उमटले. संप करणाऱ्या डॉक्‍टरांच्या समर्थनार्थ "आयएमए'ने आज "अखिल भारतीय विरोध दिना'चे आयोजन केले होते. बंगालमधील निवासी डॉक्‍टरांनी केलेल्या सर्व कायदेशीर मागण्या राज्य सरकारने बिनशर्त पूर्ण कराव्यात, असे आवाहन "आयएमए'चे सरचिटणीस आर. व्ही. अशोकन यांनी केले. 

बंगालमधील डॉक्‍टरांचे समर्थन 
पश्‍चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली राजकीय लढाई आता सरकारी व्यवस्थेची लढाई बनली आहे. "नील रत्न सरकार (एनआरएस) वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी एका कनिष्ठ डॉक्‍टरांना मारहाण केल्यानंतर तेथील डॉक्‍टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. गेल्या चार दिवसांपासून हा संप सुरूच आहे. राज्य सरकारच्या निषेधार्थ येथील अनेक डॉक्‍टरांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. दिल्लीत दिल्ली मेडिकल असोसिएशन (डीएमए) ने "काम बंद' आंदोलनाची हाक दिल्याने त्याचे परिणाम "भारतीय आयर्विज्ञान वैद्यकीय संस्थेसारख्या (एआयआयएमएस) रुग्णालयांमध्ये दिसून आले. मुंबईतही डॉक्‍टरांनी काम करण्यास नकार दिला. दिल्ली, मुंबईप्रमाणेच उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आदी अनेक राज्यांमधील डॉक्‍टरांनी आज बंद पाळला. काही ठिकाणी निदर्शने करण्यात आली, मोर्चे काढण्यात आले. बंगालमधील विविध क्षेत्रांतील नामवंतांनी संपाला पाठिंबा दिला आहे. 

डॉक्‍टरांच्या सुरक्षेसाठी पत्र 
"एआयआयएम'च्या डॉक्‍टरांच्या शिष्टमंडळाने केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची आज दिल्लीत भेट घेऊन मागण्या सादर केल्या. या वेळी हर्ष वर्धन यांनी संप मागे घेण्याचे आवाहन डॉक्‍टरांना केले. सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून डॉक्‍टरांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश देणार असल्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले. 

अंतरिम आदेशास नकार 
या संपाबाबत कोलकाता उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर दुपारी सुनावणी झाली. या वेळी मुख्य न्यायाधीश टीबीएन राधाकृष्णन आणि न्या. सुवरा घोष यांच्या खंडपीठाने डॉक्‍टरांना रुग्णसेवेच्या शपथेची आठवण करून दिली. मात्र संपावर अंतरिम आदेश काढण्यास नकार दिला. तसेच डॉक्‍टरांच्या सुरक्षेकडे लक्ष पुरवावे व हा संप सलोख्याच्या वातावरणात मिटविण्याचा आदेश न्यायालयाने बंगालच्या सरकारला दिला. या याचिकेवर 21 जून रोजी सुनावणी होणार आहे. 

"कनिष्ठ डॉक्‍टरची बतावणी' 
डॉक्‍टरांच्या संपामुळे पश्‍चिम बंगालमधील आरोग्यसेवेवर परिणाम झाला असून रुग्णांची परवड सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज उत्तर 24 परगणा येथे जाहीर सभा घेतली. मारहाण झालेले डॉक्‍टर हे कनिष्ठ डॉक्‍टर नसून ते तसे भासवत आहेत आणि त्यानुसार माध्यमांशी बोलत आहेत, असा आरोप त्यांनी केला. माध्यमांचे सर्व लक्ष सध्या माझ्याकडे आहे. ही गोष्ट मला अधिक खंबीर बनवत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

डॉक्‍टरांचे सोमवारी "काम बंद' 
कोलकात्यामधील संपावरील डॉक्‍टरांच्या एकजुटीला पाठिंबा देण्यासाठी आजपासून तीन दिवस देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय व डॉक्‍टरांच्या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी (ता. 17) संप करण्याचा "भारतीय वैद्यक परिषद'ने (आयएमए) घेतला आहे. ही माहिती परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. संप सोमवारी या सकाळी सहा ते मंगळवारी (ता.18) सहापर्यंत असा 24 तास असेल. या काळात अत्यावश्‍यक व बाह्य रुग्ण सेवा सोडून अन्य वैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार नाही. अहिंसक मार्गाने निदर्शने सुरू ठेवण्यात येणार आहेत, असे या वेळी सांगण्यात आले. डॉक्‍टर चंद्राची नव्हे, तर सुरक्षा व अन्य किरकोळ गोष्टींची मागणी करीत आहेत आणि ती पूर्ण करणे शक्‍य आहे. आम्ही आता माघार घेणार नाही, असे ठाम प्रतिपादन "आयएमए'चे सरचिटणीस आर. व्ही. अशोकन यांनी केले. 

"आयएमए'च्या मागण्या 
- आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी केंद्रिय कायदा करावा 
- हल्लेखोरांना किमान सात वर्षांच्या कारावासाची तरतूद करावी 
- अशा घटनांमध्ये गुन्हे दाखल करून आरोपींना अटक व शिक्षा होणे गरजे आहे 
- "पॉक्‍सो' कायद्यानुसार अनिवार्य तरतुदी अंमलबजावणी करावी 
- रुग्णालये ही सुरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर करावीत 
- त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्यांनी घ्यावी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com