होय! मॉन्सून येणार... सरासरीच्या 96%... 

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

सुमारे सरासरीइतका होणारा हा पाऊस अर्थव्यवस्था व शेतीसाठी पूरक ठरेल, असे प्रतिपादन करत रमेश यांनी देशाच्या सर्व भागांमध्ये पावसाचे प्रमाण समाधानकारक असेल, अशी अशी महत्त्वपूर्ण माहिती दिली

नवी दिल्ली - तीव्र उन्हाळ्याच्या असह्य झळांनी अक्षरश: पोळून निघालेल्या भारतासाठी यंदा मॉन्सूनचे आगमन सुखद ठरणार आहेच; याच पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय हवामान विभागाने आज (मंगळवार) देशात यंदा होणारा मॉन्सून सरासरीच्या 96% इतका असेल, अशी आश्‍वासक घोषणा केली.

विभागाचे संचालक के जे रमेश यांनी यासंदर्भातील घोषणा केली. सुमारे सरासरीइतका होणारा हा पाऊस अर्थव्यवस्था व शेतीसाठी पूरक ठरेल, असे प्रतिपादन करत रमेश यांनी देशाच्या सर्व भागांमध्ये पावसाचे प्रमाण समाधानकारक असेल, अशी अशी महत्त्वपूर्ण माहिती दिली. 

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 68% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये असून देशाच्या एकूण मनुष्यबळापैकी तब्बल 49% मनुष्यबळ हे रोजगारासाठी कृषि क्षेत्रावर अवलंबून आहे. या पार्श्‍वभूमीवर मॉन्सूनचे होणारे आगमन हे अर्थातच एक अत्यंत संवेदनशील वृत्त मानले जात आहे. देशात दोन वर्षे जाणविलेल्या पावसाच्या तुटवड्यानंतर गेल्या वर्षी (2016) मॉन्सून सरासरीच्या 97% इतका झाला होता. या वर्षीही मॉन्सून सुमारे सरासरीइतका होणार असल्याची घोषणा हवामान विभागातर्फे करण्यात आली आहे. भारताच्या एकूण वार्षिक पावसात ७० टक्के वाटा हा एकट्या मॉन्सून (नैर्ऋत्य मोसमी वारे) अाहे. 

गेल्या सहा-सात वर्षांपासून मॉन्सूनच्या आगमनावर ‘अल निनो’चा प्रभाव राहिला आहे. परिणामी, मॉन्सूनचे सरासरी वेळापत्रक नेहमीच प्रभावित होत आले. महाराष्ट्रासह देशातही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने गेली चार वर्षे सतत दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. पावसाने सरासरी गाठली जरी, तरी वेळापत्रकच बिघडल्याने पिकांचे उत्पादन अशाश्‍वत झाले आहे. पावसाच्या मोठ-मोठ्या खंडाने तर शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले. यंदा मात्र, तूर्त अल निनोचा प्रभाव जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर काळात राहणार नसल्याने पाऊसकाळ सुरळित पार पडण्याची आशा निर्माण झाली अाहे.

सरासरी १ जूनला मॉन्सून केरळात दाखल होतो, यानंतर ७ जूनला तो महाराष्ट्रात व १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापून उत्तर भारताकडे मार्गक्रमण करत असतो. मॉन्सूनचे परतणेसुद्धा वेळेतच होण्याचे संकेतही मिळाले अाहेत. 

पूर्व व मध्य पॅसिफिक समुद्रतळातील तापमानवाढीच्या प्रकाराला ‘अल निनो’ परिणाम असे म्हटले जाते. साधारणत: काही वर्षांनंतर निसर्गातील हा तापमानवाढीचा प्रकार होत असतो. अल निनोमुळे भारतीय मॉन्सून प्रभावित होऊन कमी पाऊस, दुष्काळ, मोठे खंड असे परिणाम होत असतात, असा अभ्यास आहे, तर दुसरीकडे ‘ला निनो’ या प्रकारात हेच समुद्रतळ तापमान कमी होत जाते, ज्यामुळे अधिक पाऊस पडण्याचे संकेत मिळत असतात.

Web Title: IMD forecasts normal monsoon in 2017