अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 September 2019

पुणे आणि बारामतीचे जनजीवन विस्कळित करणाऱ्या व अनेक बळी घेणाऱ्या महावृष्टीतील पीडितांना मदतीबाबत आपण संवेदनशीलतेने पाहत असून, पुणेकरांना यातून सावरण्यासाठी तत्काळ मदत पाठविण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत सांगितले.

नवी दिल्ली - पुणे आणि बारामतीचे जनजीवन विस्कळित करणाऱ्या व अनेक बळी घेणाऱ्या महावृष्टीतील पीडितांना मदतीबाबत आपण संवेदनशीलतेने पाहत असून, पुणेकरांना यातून सावरण्यासाठी तत्काळ मदत पाठविण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत सांगितले. पुण्याचे जिल्हाधिकारी, नियंत्रण कक्ष व महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण सातत्याने संपर्कात आहोत, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्या (ता. २७) पुण्याच्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुण्यात पावसाने कहर केला असताना मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व अन्य नेते दिल्लीत भाजपच्या निवडणूक बैठकीसाठी पोचले, याबद्दल चौफेर टीका सुरू झाली. त्यावर फडणवीस यांनी बैठक सुरू असलेल्या दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजप मुख्यालयाबाहेर येऊन पुण्यातील जलप्रलयाबाबत सरकारच्या उपाययोजनांची माहिती पत्रकारांना दिली. माजी उपमुख्यमंत्री व बारामतीचे आमदार अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला व सर्वतोपरी मदतीचे आदेश प्रशासनास दिल्याचे सांगितले. त्यांनी याबाबत लगेचच ट्विटही केले. ते म्हणाले की, पुण्यात काल रात्री झालेल्या पावसाने उद्‌ध्वस्त झालेल्या नागरिकांना सावरण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ मदत पुरविली असून, यापुढेही ती पोचविली जाईल. पुण्यासाठी दोन, तर बारामतीसाठी दोन राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके (एनडीआरएफ) रवाना करण्यात आली आहेत. आणखीही आवश्‍यक ती मदत तत्काळ पोचविण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. पुण्यावर अचानक कोसळलेल्या या आपत्तीत सर्वस्व गमावलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली. ‘एनडीआरएफ’च्या जवानांनी काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले असून, आणखी काही जणांना हलविण्याचे काम सुरू आहे. मी परिस्थितीवर नजर ठेवून आहे, असे ते म्हणाले.

बारामतीत कऱ्हा नदीला पूर आला असून, पुरात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकार पूरग्रस्तांना मदतीसाठी सारे उपाय करीत आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

स्थितीवर बारकाईने लक्ष - पाटील
चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, पावसाचा जोर वाढल्यापासून मी व जिल्हाधिकारी सातत्याने संपर्कात आहोत. बारामतीत नदीकाठच्या बहुतांश लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. ‘एनडीआरएफ’च्या जवानांनी मदतकार्य सुरू केले असून, कात्रजजवळील महामार्ग काही अंशी सुरळीत झाला आहे. परतीचा पाऊस कधीही इतका मोठा नसतो. या अनैसर्गिक संकटाला सर्वांनी एकदिलाने तोंड द्यायचे आहे. प्रशासन आपत्कालीन परिस्थितीत सारी मदत पुरवत आहे व सरकारचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Immediate help to rainstorms