
बूस्टर डोसपेक्षा ओमिक्रॉन संसर्गानं रोगप्रतिकारशक्ती वाढतेय, अभ्यासकांचा दावा
जगभरातील लोकांना कोरोनाने (Corona) ग्रासलं होतं. अर्ध्यापेक्षा अधिक जनतेला कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे. त्यामुळे भारतात रुग्ण (India Corona Cases) रुग्णालयात दाखल होण्याचा दर खूपच कमी झाला आहे. तसेच पुन्हा कोरोना होण्याचं प्रमाण देखील कमी आहे. पण, लसीकरण केलेल्या लोकांमध्ये बूस्टर डोसपेक्षा (Booster Dose) ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढतेय, असे एका अभ्यासातून दिसून आले आहे.
लस निर्माता बायोएनटेक एसई आणि वॉशिंग्टन यांनी हा अभ्यास केला आहे. bioRxiv सर्व्हरवर हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. लसीकरण झालेल्या लोकांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढलेली होती. ते कोरोनाचा अधिक चांगल्या प्रकारे सामना करत असल्याचं दिसून आलं. पण, आमच्या अभ्यासाच्या निष्कर्षामुळे तुम्ही संक्रमणाला बळी पडू नका, असं आवाहन देखील अभ्यासकांनी केलं आहे.
पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील इन्स्टिट्यूट फॉर इम्युनोलॉजीचे प्राध्यापक आणि संचालक जॉन व्हेरी यांनी या अभ्यासाचं पुनरावलोकन केलं. ओमिक्रॉनचं संक्रमण लशीच्या दुसऱ्या डोसच्या बरोबर मानले पाहिजे. कोणाला नुकताच कोविड झाला असेल तर त्यांनी लगेच बूस्टर डोस घेऊ नये, असं त्यांनी ब्लमूबर्गला सांगितलं. लसीकरण न केलेल्या लोकांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला असेल तर त्यांच्यासाठी तो धोकादायक आहे, असं अभ्यासात नमूद केलं आहे.
उत्तर कोरिया आणि चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक -
चीन आणि उत्तर कोरियासारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नवीन संशोधन आले आहे. शांघायमध्ये जवळपास एक दशलक्ष लोक कडक लॉकडाऊनमध्ये आहेत. शांघायमध्ये समूह संक्रमण झाल्याची भीती आहे. चीनमध्ये सोमवारी एकूणच संसर्गाची 1,159 प्रकरणे नोंदवली गेली. पण, यापैकी अनेकांना लक्षणं नव्हती.