
Rahul Gandhi In US: 'त्या' विषयावर राहुल गांधींची मोदींना साथ, अमेरिकेतल्या भाषणात विरोध करण्यास दिला नकार
Rahul Gandhi In America: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सद्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी गुरुवारी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यावर भाष्य केले.
राहुल गांधी म्हणाले की, ''भारतातील मानहानीच्या प्रकरणात मला कदाचित सर्वात जास्त शिक्षा झाली आहे. असे काही घडेल असे मला कधीच वाटले नव्हते''
राहुल गांधी म्हणाले, "भाषणाच्या अगोदर मी माझा परिचय ऐकला. यामध्ये मला माजी खासदार म्हटले गेले. 2004 मध्ये मी जेव्हा राजकारणात प्रवेश केला तेव्हा मला वाटले नव्हते की, आता देशात जे काही घडत आहे, ते पाहायला मिळेल.''
आम्ही लोकशाही मार्गाने लढत आहोत: राहुल गांधी
लोकसभेचे सदस्यत्व रद्द झाल्याच्या घटनेचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, ''भारतातील विरोधक संघर्ष करत आहेत. सर्व संस्था भाजपच्या ताब्यात आहेत.
आम्ही लोकशाही मार्गाने हा लढा देत आहोत. कोणतीही संस्था आम्हाला मदत करत नसल्याचे पाहून आम्ही रस्त्यावर उतरलो आणि त्यामुळे भारत जोडी यात्रा झाली.''

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी
काश्मीरवर काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी दावा केला की, "प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मला सांगितले की तुम्ही काश्मीरमध्ये गेलात आणि 4 दिवस यात्रा केली तर तुमचा जीव जाऊ शकतो, पण मी त्यांना सांगितले की जे व्हायचयं ते होईल.
मला पाहायचे होते की माझ्यावर ग्रेनेड कोण फेकेल. सुरक्षा कर्मचारी, प्रशासनातील लोक माझ्याकडे पाहत होते आणि त्यांचा चेहरा पाहून मला असे वाटले की मी काय बोलतोय ते त्यांना समजले नाही?''
चीनसोबतच्या संबंधांवर राहुल गांधी काय म्हणाले?
भारत-चीन संबंध सध्या ठीक नसल्याचे राहुल यांनी सांगितले. त्यांनी भारताचा काही प्रदेश काबीज केला आहे. हे देशासाठी अवघड आहे.
रशियाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे वक्तव्य:
जेव्हा राहुल यांना विचारण्यात आले की त्यांनी रशियाबाबत भारताच्या तटस्थ भूमिकेचे समर्थन केले आहे का? यावर राहुल म्हणाले, ''आमचे रशियाशी चांगले संबंध आहेत, आमचे रशियावर काही अवलंबित्व आहे. त्यामुळे भारत सरकार जी भूमिका घेते तीच भूमिका मी घेईन.''
मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा:
2019 मध्ये मोदी आडनावावर दिलेल्या भाषणावर सूरत न्यायालयाने या वर्षी मार्चमध्ये मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवले होते. न्यायालयाने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर राहुल यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले.