प्राप्तिकर बुडव्यांना आता अटक

पीटीआय
बुधवार, 22 जून 2016

नवी दिल्ली - प्राप्तिकर बुडविणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, हे रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागाने अधिकाऱ्यांना अशा प्रकरणांमध्ये दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याअंतर्गत कर बुडविणाऱ्यांना अटक करणे, ताब्यात घेणे यासह मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल. 

नवी दिल्ली - प्राप्तिकर बुडविणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, हे रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागाने अधिकाऱ्यांना अशा प्रकरणांमध्ये दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याअंतर्गत कर बुडविणाऱ्यांना अटक करणे, ताब्यात घेणे यासह मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल. 

यासंबंधी चालू आर्थिक वर्षासाठी कारवाईचा आराखडा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) तयार केला आहे. कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यक्तीला प्राप्तिकर कायदा कलम 276 उपकलम क (2) नुसार तीन महिने ते तीन वर्षे कारावासाची शिक्षा व दंड करता येतो. विभागाकडून अगदी अपवादाने ही कारवाई करण्यात येते. आता मात्र, अधिकाऱ्यांनी जास्तीतजास्त प्रमाणात कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी कर वसुली अधिकारी (टीआरओ) नेमण्यात आले असून, ते ही कारवाई करतील. 

तसेच, "टीआरओ‘ना पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासोबत त्यांना कार्यक्षमता वाढविण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. नोटीस बजावूनही कर बुडविणाऱ्या व्यक्तीला अटक, तसेच ताब्यात घेण्याची कायदेशीर तरतूद परिशिष्ट 2 मधील नियम 73 ते 81 मध्ये आहे. कर लवादासमोर प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या 2.32 लाखांवरून 2.58 लाखांवर गेली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी 1.33 लाख प्रकरणे निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

विवरणपत्र न भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ 

प्राप्तिकर विवरणपत्र न भरणाऱ्या करपात्र व्यक्तींची संख्या 2014 मध्ये 22.09 लाख होती. ती 2015 मध्ये वाढून 58.95 लाखांवर पोचली आहे. 2013 मध्ये हा आकडा केवळ 12.19 लाख होता. विवरणपत्र न भरणाऱ्या करपात्र व्यक्तींवर कारवाई करून कर भरणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढविण्याचा प्राप्तिकर विभागाचा प्रयत्न आहे. विवरणपत्र भरणे आवश्‍यक असूनही ते न भरणाऱ्या व्यक्‍तीला दंडात्मक कारवाईत एक ते पाच हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. कायदेशीर कारवाईत तीन महिने ते तीन वर्षांची शिक्षा आणि दंड होऊ शकतो. 

याआधी कर वसुली अधिकारी (टीआरओ) अगदी शेवटच्या टप्प्यात कारवाई करीत होते. मोठ्या प्रमाणात कर बुडविला असल्यास एखाद्या प्रकरणातच टीआरओ अटक अथवा ताब्यात घेण्याची कारवाई करीत होते. आता मात्र, करबुडव्यांची समस्या वाढल्याने कारवाईचे प्रमाण वाढविण्यात येईल. 

- प्राप्तिकर विभाग

Web Title: Income tax defaulters will now be arrested