कमी भरणा करणाऱ्यांना त्रास होणार नाही - जेटली

पीटीआय
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

कराच्या सवलत मर्यादेच्या आत असलेल्या रकमेचा भरणा बॅंकिंग व्यवस्थेत कोणतेही प्रश्‍न न विचारता नेहमीप्रमाणे होईल. केवळ मोठ्या रकमेचा व बेहिशेबी पैशांचा भरणा करणाऱ्यांवर कर कायद्यानुसार कारवाई होईल. 

- अरुण जेटली,  केंद्रीय अर्थमंत्री

नवी दिल्ली - पाचशे व हजारच्या जुन्या नोटा कमी प्रमाणात जमा करणाऱ्या नागरिकांना प्राप्तिकर विभागाकडून कोणताही त्रास होणार नाही, अशी हमी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी दिली. नोटा बदलण्यासाठी पुरेसा कालावधी असल्याने नागरिकांनी बॅंकांमध्ये गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. 

जेटली म्हणाले, ‘‘जुन्या नोटा कमी प्रमाणात जमा करणाऱ्या नागरिकांना कोणीही प्रश्‍न विचारणार नाही, तसेच त्यांना कोणताही त्रास देण्यात येणार नाही. नागरिक ऐन वेळी लागतील यासाठी घरात पैसे साठवून ठेवतात, ते बॅंकेतील त्यांच्या खात्यात नोटा जमा करू शकतील. छोट्या रकमेच्या या जमेची प्राप्तिकर विभाग दखल घेणार नाही; मात्र बेहिशेबी पैसा मोठ्या प्रमाणात जमा करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाची करडी नजर असणार आहे. त्यांच्यावर कर कायद्यानुसार कारवाई होणार असून, त्यांना करासोबत दोनशे टक्के दंडही भरावा लागणार आहे. 

Web Title: The Income Tax Department has no trouble citizens