कॉंग्रेसचे आमदार असलेल्या "रिसॉर्ट'वर प्राप्तिकर विभागाची धाड

वृत्तसंस्था
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

राज्यसभेची केवळ एक जागा जिंकण्यासाठी भाजपकडून सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे. विजय मिळविण्यासाठी भाजपकडून करण्यात आलेला प्राप्तिकर विभागाचा वापर त्यांना आलेले नैराश्‍य दर्शवित आहे

नवी दिल्ली - कॉंग्रेस पक्षाचे गुजरातमधील 42 आमदार राहत असलेल्या कर्नाटकमधील एका रिसॉर्टवर प्राप्तिकर विभागाने आज (बुधवार) धाड घातली.

भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) या आमदारांना फोडण्यात येऊ नये, या उद्दिष्टासाठी या आमदारांना रिसॉर्टमध्ये "ठेवण्यात' आले आहे. कर्नाटकमधील उर्जा मंत्री डी के शिवकुमार हे या आमदारांची "काळजी' घेत आहेत. गुजरातमधून कॉंग्रेस ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना राज्यसभेवर पाठविण्यासाठी या आमदारांचा पाठिंबा कळीचा आहे. मात्र भाजपकडून त्यांना फोडले जाण्याची भीती असल्याने कॉंग्रेसकडून या प्रकरणी अत्यंत काळजी घेण्यात येत आहे. याच पार्श्‍वभूमीवर घालण्यात आलेली ही धाड अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.

दरम्यान, शिवकुमार यांच्याशी संबंधित असलेल्या 39 ठिकाणी प्राप्तिकर विभागाने घातलेल्या धाडी ही भाजपकडून सूडबुद्धीने करण्यात आलेली कारवाई असल्याची टीका कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी केली आहे. शिवकुमार यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी घालण्यात आलेल्या धाडीमध्ये पाच कोटी रुपये आढळले आहेत. "राज्यसभेची केवळ एक जागा जिंकण्यासाठी भाजपकडून सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे. विजय मिळविण्यासाठी भाजपकडून करण्यात आलेला प्राप्तिकर विभागाचा वापर त्यांना आलेले नैराश्‍य दर्शवित आहे,' असे पटेल म्हणाले.

Web Title: Income Tax Dept searches Karnataka resort where Gujarat Congress MLAs are holed up