'आयआयटी' मुलींचा टक्का वाढावा : राष्ट्रपती

पीटीआय
शनिवार, 21 जुलै 2018

आयआयटीतील मुलींचे प्रमाण वाढविण्याचे आव्हान तसेच मुली व तरुण महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध न केल्यास समाजाचा विकास कधीही पूर्ण होऊ शकणार नाही. ही बाब सामाजिक समानता व आर्थिक विकासासाठी मारक आहे. उच्च शिक्षण तसेच विज्ञान व तंत्र शिक्षणात महिलांचा सहभाग वाढविणे हे राष्ट्रीय प्राधान्य असायला हवे. यासाठी आयआयटी समितीने पुढाकार घ्यावा. 

- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती 

खडगपूर (पश्‍चिम बंगाल) : दहावी-बारावी, महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावरील परीक्षांमध्ये मुलांपेक्षा मुली चमकतात. मात्र "इंडियन इन्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी'च्या (आयआयटी) पातळीवर मुलींचे प्रमाण कमी असणे ही दुःखद बाब असून, मुलींचा टक्का "आयआयटी'त वाढायला हवा, अशी आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी केले. 

आयआयटी खडगपूरच्या 64 व्या पदवीदान समारंभात कोविंद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ""2017मध्ये एक लाख 60 हजार उमेदवार आयआयटीच्या सामाईक प्रवेश परीक्षेला बसले होते. त्यात मुलींची संख्या फक्त 30 हजार होती. निवड झालेल्या 10 हजार 878 विद्यार्थ्यांमध्ये 995 मुली होत्या. आयआयटीत मुलींची संख्या कमी का असते हे माझ्यासाठी कोडे आहे; असे होता कामा नये. यासाठी आपल्याला काही तरी करायला हवे.'' दहावी-बारावीच्या परीक्षेचा विचार करता तेथे मुलींची कामगिरी चमकदार असते. त्या कायमच मुलांपेक्षा सरस ठरतात. महाविद्यालये किंवा विद्यापीठांत मी जातो, तेव्हाही पदकविजेत्यांमध्ये मुलींची संख्या जास्त असल्याचे दिसते; पण "आयआयटी'त प्रवेश घेणाऱ्या मुली कमी आढळतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

आयआयटी खडगपूरमधील स्थिती 

11, 653 
एकूण विद्यार्थी 

1,925 
मुलींची संख्या 

16 टक्के 
मुलींचे एकूण प्रमाण 

Web Title: Increase in percentage of girls in IIT says President