देशभरात रोजगार वाढले; मिळाल्या 9 लाख नोकऱ्या

देशभरात रोजगार वाढले; मिळाल्या 9 लाख नोकऱ्या

नवी दिल्ली : देशभरात रोजगार वाढल्याचा दावा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) केला आहे. जानेवारी महिन्यात 8 लाख 96 हजार 516 नोकऱ्या उपलब्ध झाल्याचे "ईपीएफओ'च्या ताज्या आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत रोजगार निर्मितीत 131 टक्‍क्‍यांची वाढ झाली असून, हा 17 महिन्यांतील उच्चांक आहे. दरम्यान, राष्ट्रीय नमुना पाहणी अहवालातील बेरोजगारीच्या आकडेवारीने अडचणीत आलेल्या केंद्र सरकारसाठी "ईपीएफओ'चा रोजगारविषयक अहवाल दिलासादायक ठरणार आहे. 

"ईपीएफओ'कडून एप्रिल 2018 पासून रोजगाराचा तपशील जाहीर केला जातो. सप्टेंबर 2017 मध्ये 2 लाख 75 हजार 609 नोकऱ्या उपलब्ध झाल्या होत्या. सप्टेंबर 2017 ते जानेवारी 2019 या कालावधीत "ईपीएफओ'कडे सामाजिक सुरक्षा योजनांअंतर्गत 76 लाख 48 हजार नव्या सदस्यांनी नोंदणी केली आहे. बहुतांश रोजगार संघटित क्षेत्रात निर्माण झाले आहेत. "ईपीएफओ'ने मागील रोजगारांची सुधारित आकडेवारी जाहीर केली आहेत. त्यानुसार डिसेंबर 2018 मध्ये रोजगारात 1.8 टक्‍क्‍यांची घट करून 7 लाख 3 हजार नवे रोजगार उपलब्ध झाल्याचे म्हटले आहे.

त्याशिवाय सप्टेंबर 2017 ते डिसेंबर 2018 या कालावधीत 67 लाख 52 हजार नोकऱ्या निर्माण झाल्याचा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे. मार्च 2018 मध्ये 29 हजार कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली होती. "पीएफ"चा लाभ घेण्यासाठी "यूएएन'नुसार नोंदणी होणाऱ्या नव्या सदस्यांवरून रोजगार निर्मितीचा अंदाज "ईपीएफओ'कडून व्यक्त करण्यात येतो. 

तरुणाईच्या हाताला काम 

"ईपीएफओ'च्या रोजगार अहवालानुसार, जानेवारीतील 8 लाख 96 हजार नव्या नोकऱ्यांपैकी 22 ते 25 वयोगटातील 2 लाख 44 हजार उमेदवारांच्या हाताला काम मिळाले आहे. यात 18 ते 21 वयोगटातील 2 लाख 24 हजार नवख्या उमेदवारांना नोकरी उपलब्ध झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com