इराक, अफगाणिस्ताननंतर "दहशतवादा'चा सर्वाधिक फटका भारतास...

वृत्तसंस्था
रविवार, 23 जुलै 2017

इस्लामिक स्टेट (इसिस) व तालिबान या दहशतवादी संघटनांनंतर भारतातील नक्षलवादी हे तिसरे सर्वांत धोकादायक दहशतवादी असल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे. भारतातील नक्षलवाद्यांनी हिंसाचाराच्या या स्पर्धेत बोको हराम या दहशतवादी संघटनेसही मागे टाकले आहे

नवी दिल्ली - अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने तयार केलेल्या अहवालामध्ये 2016 मध्ये इराक व अफगाणिस्तान या देशांनंतर भारतास दहशतवादाचा सर्वांत अधिक फटका बसल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. या यादीमध्ये याआधी पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर होता.

या अहवालानुसार 2016 या वर्षात जगभरात 11,702 दहशतवादी हल्ले झाले. यांमधील तब्बल 927 हल्ले भारतात घडविण्यात आले. 2015 मध्ये भारतात 798 दहशतवादी हल्ले झाले होते. 2016 मध्ये हे प्रमाण 16 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. भारतात दहशतवादामुळे होणाऱ्या मृत्युंमध्येही वाढ झाली आहे. 2015 मध्ये देशात दहशतवादामुळे 289 मृत्यु झाले; 2016 मध्ये हा आकडा 337 इतका झाला. याचबरोबर दहशतवादी हल्ल्यांत 2015 मध्ये 500 भारतीय जखमी झाले; तर 2016 मध्ये हीच संख्या 636 पर्यंत गेल्याचे निष्पन्न झाले आहे. या उलट पाकिस्तानमध्ये 2015 च्या तुलनेमध्ये 2016 त दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण तब्बल 27 टक्‍क्‍यांनी घटले आहे. 2015 मध्ये 1010 दहशतवादी हल्ले घडविण्यात आलेल्या पाकिस्तानमध्ये 2016 त 734 दहशतवादी हल्ले झाले.

भारतात माओवादी हिंसाचाराचा भडका 
इस्लामिक स्टेट (इसिस) व तालिबान या दहशतवादी संघटनांनंतर भारतातील नक्षलवादी हे तिसरे सर्वांत धोकादायक दहशतवादी असल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे. भारतातील नक्षलवाद्यांनी हिंसाचाराच्या या स्पर्धेत बोको हराम या दहशतवादी संघटनेसही मागे टाकले आहे. देशात गेल्या वर्षी (2016) घडविण्यात आलेल्या एकूण दहशतवादी हल्ल्यांतील 336 हल्ले नक्षलवाद्यांनी घडविले होते; व यामध्ये 174 नागरिक मृत्युमुखी पडले. तसेच, नक्षलवाद्यांच्याच्या हल्ल्यात 141 नागरिक जखमी झाल्याचेही आढळून आले आहे. या काळात देशात घडविण्यात आलेल्या एकूण दहशतवादी हल्ल्यांच्या 50 टक्‍क्‍यांपेक्षाही जास्त हल्ले जम्मु काश्‍मीर, छत्तीसगड, मणिपूर व झारखंड या चार राज्यांमध्येच घडविण्यात आले आहेत.

जुलै 2016 मध्ये नक्षलवाद्यांनी बिहारमध्ये घडविलेला हल्ला, हा 2016 मधील सर्वांत भीषण दहशतवादी हल्ला होता, असे निरीक्षण या अहवालामध्ये नोंदविण्यात आले आहे. या हल्ल्यात हल्लेखोरांसह 16 जण मृत्युमुखी पडले होते. किंबहुना, भारतातील एकूण दहशतवादी हल्ल्यांपैकी तब्बल सुमारे दोन तृतीयांश हल्ले नक्षलवाद्यांकडून घडविण्यात आले आहेत. याचबरोबर इतर कोणत्याही देशाच्या तुलनेमध्ये भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडविणाऱ्या दहशतवादी गटांमध्ये जास्त "वैविध्य' असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. भारतात दहशतवादी हल्ले घडविणाऱ्या संघटनांची संख्या तब्बल 52 झाली आहे. ही संख्या 2015 मध्ये 45 इतकी होती.

जम्मु काश्‍मीर राज्यातील दहशतवादी हल्ल्यांतही 2015 च्या तुलनेमध्ये तब्बल 93% वाढ झाल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. यासंदर्भात भारतीय गृहमंत्रालयाने जम्मु काश्‍मीर राज्यातील दहशतवादी हल्ल्यांत 54.81% इतकीच वाढ झाल्याचे म्हटले आहे.

जगामध्ये घडविण्यात आलेले दहशतवादी हल्ले व त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या; या दोन्हींत 2015 च्या तुलनेत 2016 मध्ये अनुक्रमे 9 व 13 टक्‍क्‍यांनी घट झाल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे.  

अफगाणिस्तान, सीरिया, नायजेरिया, पाकिस्तान आणि येमेन या देशांमध्ये दहशतवादी हल्ले तुलनात्मकदृष्टया कमी झाल्याने हे प्रमाण घटल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

Web Title: India 3rd largest terror target after Iraq and Afghanistan