विज्ञान-तंत्रज्ञानात 2030 पर्यंत भारत जगातील 3 प्रमुख देशात: मोदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

तिरुपती : विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात 2030 पर्यंत भारताचा जगातील तीन प्रमुख देशांमध्ये समावेश होईल, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) व्यक्त केला. तिरुपती येथील व्यंकटेश्‍वरा विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या 104 व्या विज्ञान काँग्रेसच्या उद्‌घाटनप्रसंगी मोदी बोलत होते.

'देशाच्या विकासात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रमुख भूमिका आहे. सरकार विज्ञान आणि संशोधन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. उत्पादन आणि सेवा क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याची गरज आहे', असे मोदी यांनी यावेळी सांगितले. आपल्याकडील पायाभूत सुविधा आणि समाजकल्याणाशी संबंधित मंत्रालयांनी शक्‍य तेथे विज्ञानाचा वापर करण्याचे आवाहनही मोदी यांनी यावेळी केले.

व्यंकटेश्‍वरा विद्यापीठाच्या ताराकराम मैदानावर 104 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 7 जानेवारीपर्यंत चालणार आहे. विज्ञान काँग्रेसच्या तिरुपतीमध्ये आयोजनची ही दुसरी वेळ आहे.

यावेळी आंध्रप्रदेशचे राज्यपाल ईएसएल नरसिंहन, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू, केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री हर्ष वर्धन यांच्यासह अन्य काही मान्यवर उपस्थित होते. आपल्या तिरुपती दौऱ्यादरम्यान मोदी यांनी व्यंकटेश्‍वर मंदिरात दर्शन घेतले.

Web Title: India Among Top 3 in Science, Tech By 2030, Says PM