भारत बांगलादेशला देणार 4.5 अब्ज डॉलरचे अर्थसाह्य

वृत्तसंस्था
शनिवार, 8 एप्रिल 2017

पंतप्रधान मोदी म्हणाले : 
- भारत आणि बांगलादेशमध्ये डिझेलचा पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकली जाणार. 
- बांगलादेशमध्ये भारतीय कंपन्या गुंतवणूक करणार 
- बांगलादेशला होणाऱ्या वीजपुरवठ्यात भारत वाढ करणार 
- तिस्ताच्या पाणीवाटपाच्या तिढ्यावर लवकरच तोडगा काढणार 

नवी दिल्ली : बांगलादेशमधील विविध विकासकामांसाठी भारताने त्या देशास 4.5 अब्ज डॉलरचे अर्थसाह्य देऊ केले आहे. याद्वारे बांगलादेशमधील विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) 22 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. 

पंतप्रधान मोदी म्हणाले, "बांगलादेशचा सर्वांगीण विकास होण्यासाठी भारताने नेहमीच प्रयत्न केले आहेत. भारत हा बांगलादेशचा विकासातील विश्‍वासू साथीदार आहे. बांगलादेशमध्ये माहिती-तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, अवकाश विज्ञान आणि अणुउर्जेच्या क्षेत्रात भारत सहकार्य करू इच्छितो.'' मोदी आणि शेख हसिना या दोघांनी व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून कोलकाता ते ढाका या बससेवेचेही उद्‌घाटन केले. गेल्या सात वर्षांत प्रथमच बांगलादेशच्या पंतप्रधान भारत दौऱ्यावर आल्या आहेत. आज त्यांचे राष्ट्रपती भवनात मोठ्या उत्साहात स्वागत झाले. 

शेख हसिना यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदी कोणत्याही लवाजम्याशिवायच विमानतळावर हजर झाले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या वाहनांच्या ताफ्यासाठी दिल्लीतील वाहतूक रोखण्यात आली नव्हती. 

पंतप्रधान मोदी म्हणाले : 
- भारत आणि बांगलादेशमध्ये डिझेलचा पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकली जाणार. 
- बांगलादेशमध्ये भारतीय कंपन्या गुंतवणूक करणार 
- बांगलादेशला होणाऱ्या वीजपुरवठ्यात भारत वाढ करणार 
- तिस्ताच्या पाणीवाटपाच्या तिढ्यावर लवकरच तोडगा काढणार 

शेख हसिना म्हणाल्या : 
- दोन्ही देशांमध्ये रेल्वे आणि बससेवा सुरू झाल्यास त्याचा फायदाच होणार आहे 
- दोन्ही देशांमधील सीमारेषेवरील बेकायदा आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या हालचालींना पायबंद घालण्याची गरज आहे 

Web Title: India announces $4.5bn line of credit to Bangladesh, 22 pacts signed