कोरोनानंतर भारताला आणखी एका आजाराचा विळखा, ICMR चा अहवाल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 August 2020

कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करत असताना इतर आजारांशी लढण्याचे आव्हानही आरोग्य यंत्रणेसमोर आहे. 

नवी दिल्ली - सध्या भारतासह जग कोरोनाशी लढा देत आहे. कोरोनाचे संकट अद्याप कमी झालेलं नसताना इतर आजारांचाही धोका आहे. कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करत असताना इतर आजारांशी लढण्याचे आव्हानही आरोग्य यंत्रणेसमोर आहे. भारतातील कर्करुग्णांची संख्या या वर्षी १३.९ लाख असून ती २०२५ पर्यंत १५.७ लाखापर्यंत जाणार असल्याचा अंदाज भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि बंगळूर येथील राष्ट्रीय रोग सूचना विज्ञान आणि संशोधन केंद्र (एनसीडीआयआर) यांनी व्यक्त केला. यात महिला रुग्णांची संख्या तुलनेने जास्त असल्याचे म्हटले आहे. ‘आयसीएमआर’ आणि ‘एनसीडीआयआर’च्या अहवालानुसार यंदा पुरुष कर्करुग्णांची संख्या सहा लाख ७९ हजार ४२१ एवढी गृहीत धरली असून २०२५ पर्यंत ती सात लाख ६३ हजार ५७५ पर्यंत पोचेल. 

महिला रुग्णांचे प्रमाण या वर्षी अंदाजे सात लाख १२ लाख ७५८ असून पाच वर्षांत ते ८ लाख ६ हजार २१८ होण्याची शक्यता आहे. यात स्तनाच्या कर्करोगाची लागण झालेल्या महिलांची संख्या दोन लाख ३८ हजार ९०८ असेल तर त्यानंतर फुप्फुसाचा कर्करोग (१,११,३२८) आणि मुखाचा कर्करोग (९०,०६०) होण्याचे जास्त असेल. 

हे वाचा - सरकारी नोकरभरतीसाठी ‘सीईटी’; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

पुरुषांना होणारा कर्करोग  - फुप्फुस, मुख, पोट, अन्ननलिका 
महिलांना होणारा कर्करोग - स्तन, गर्भाशय, फुप्फुस, डोके व मान, पोट 

No photo description available.

बहुविध उपचार पद्धती 
स्तन, डोके व मानेचा कर्करोग -  शस्त्रक्रिया, केमो थेरपी व रेडिएशन थेरपी 
गर्भाशयाचा कर्करोग - रेडिओथेरपी आणि केमो थेरपी 
फुप्फुस व पोटाचा कर्करोग - सिस्टेमिक थेरपी 

हे वाचा - प्रियांका गांधींच्या जुन्या वक्तव्यावर काँग्रेसची सारवासारव; भाजपवर केले आरोप

तंबाखूमुळे कर्करोग झालेल्यांची संख्या सध्या ३.७ लाख असून एकूण कर्करुग्णांमध्ये त्याचे प्रमाण २७.१ टक्का आहे. ईशान्य भारतात हे प्रमाण सर्वाधिक आहे. याखालोखाल, जठर व स्तनाच्या कर्करुग्णांची संख्या आहे, असे ‘आयसीएमआर’ने म्हटले आहे. ‘राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रम २०२०’ यामध्ये हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. लोकसंख्येवर आधारित कर्करुग्ण नोंदणीचे २८ अहवाल आणि ५८ रुग्णालयांतील नोंदणीच्या आधारे हा अभ्यास केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india cancer patient will increase in next five year icmr report