esakal | चीनने ना ऐकलं, ना स्वत:चं सांगितलं; भारतासोबत चर्चेची १३ वी फेरी निष्फळ | India - China
sakal

बोलून बातमी शोधा

चीनने ना ऐकलं, ना स्वत:चं सांगितलं; भारताशी चर्चेची १३ वी फेरी निष्फळ

भारतीय लष्कराने चर्चेच्या १३ व्या फेरीत काय झालं याची माहिती दिली आहे. प्रत्यक्ष निंयत्रण रेषेवर तणावाची स्थिती अद्याप कायम आहे.

चीनने ना ऐकलं, ना स्वत:चं सांगितलं; भारताशी चर्चेची १३ वी फेरी निष्फळ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - भारत आणि चीन यांच्यात गेल्या वर्षी मे महिन्यापासून सुरु असलेला वाद अद्याप सुटलेला नाही. रविवारी दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली मात्र यातही काहीच निष्पन्न झालं नाही. चीनने ना भारताचे ऐकून घेतले ना स्वत:चे काही सांगितले. भारतीय लष्कराने चर्चेच्या १३ व्या फेरीत काय झालं याची माहिती दिली आहे. प्रत्यक्ष निंयत्रण रेषेवर तणावाची स्थिती अद्याप कायम आहे. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत झालेल्या चर्चेतून काहीच तोडगा निघालेला नाही.

रविवारी कोअर कमांडर स्तरावर चर्चा झाली. चुशुल मोल्दो सीमेवर दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी ही चर्चा केली. यावेळी दोन्ही देशातंमध्ये पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसह इतर मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. मात्र यातही काहीच समाधानकारक अशी चर्चा होऊ शकली नाही.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर उद्भवलेली परिस्थिती ही चीनने द्विपक्षीय कराराचे उल्लंघन करत केलेल्या एकतर्फी प्रयत्नांमुळे निर्माण झाली असल्याचं भारताने यावेळी सांगितलं. त्यामुळे संबंधित भागात चीनने योग्य ती पावले उचलावीत आणि पश्चिम भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता निर्माण व्हावी असंही भारताने म्हटलं.

हेही वाचा: भागवतांचं धर्मांतरावरुन मोठं वक्तव्य; म्हणाले, 'लग्नासाठी धर्मांतर करणाऱ्या मुली...'

भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत काही गोष्टींवर एकमत झालं होतं. दोन्ही देशांनी उर्वरित प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यावर भर देण्याचं ठरवलं होतं. यामुळे द्विपक्षीय संबंधात सुधारणा होईल असा विश्वास तेव्हा व्यक्त करण्यात आला होता. आता बैठकीवेळी इतर भागांमधील मुद्यांवर काही सल्लावजा सूचना सांगितल्या मात्र त्यावर चीनने नकारार्थी प्रतिसाद दिला. तसंच त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव दिला गेला नाही. त्यामुळे कोणत्याही तोडग्याशिवाय बैठक संपली.

दोन्ही पक्षांनी चर्चा सुरु ठेवणं आणि स्थैर्य कायम ठेवण्यावर सहमती दर्शवली. भारताने आशा व्यक्त केली की चीन द्विपक्षीय संबंध लक्षात ठेवून करार आणि प्रोटोकॉलचे पालन करेल. तसंच ज्या मुद्यांवर वाद आहे त्यावर लवकरच मार्ग काढण्यासाठी दोन्ही देश काम करतील.

हेही वाचा: हिंदू मंदिरातील पैसे अल्पसंख्यांक आणि अधर्मी लोकांकडे जातात - साध्वी प्रज्ञा

आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये सीमेवर शांततेसाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही काहीच तोडगा निघालेला नाही. चीनने यावेळीसुद्धा अडेलतट्टू भूमिका घेतल्याचं दिसून आलं. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये भारतावरच आरोप करण्यात आले आहेत. भारताने चुकीच्या आणि अवास्तव मागण्या मांडल्याचं चीनने म्हटलं आहे. तसंच चर्चेत अडथळा आणण्याचं काम भारताने केलं असाही आरोप चीनने केला आहे.

loading image
go to top