भारत-चीन चर्चेची फेरी निर्णयाविनाच; सैन्याला संयम राखण्याची सूचना

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 8 November 2020

भारत आणि चीन दरम्यान चर्चेची आठवी फेरी शुक्रवारी रात्री कोणत्याही निष्कर्ष किंवा निर्णयाविना संपली.

नवी दिल्ली- भारत आणि चीन दरम्यान चर्चेची आठवी फेरी शुक्रवारी रात्री कोणत्याही निष्कर्ष किंवा निर्णयाविना संपली. उभय देशांनी आज जारी केलेल्या एका संक्षिप्त पत्रकात दोन्ही देशांनी त्यांच्या सीमेवरील सैन्याला संयम व नियंत्रणात राहण्याची खात्री देण्याबरोबरच कोणत्याही प्रकारची गैरसमजूत किंवा चुकीची कृती न करण्याच्या मुद्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

दोन्ही देशांच्या लष्करी कमांडरांच्या स्तरावरील वाटाघाटींची आठवी फेरी पूर्ण झाल्यानंतर उभय देशांतर्फे आणखी एका चर्चेच्या फेरीचे सूतोवाच या पत्रकात करण्यात आले आहे. मात्र त्याची तारीख निश्‍चित करण्यात आलेली नाही. चुशुल येथे झालेल्या या बैठकीत दोन्ही देशांदरम्यान सखोल आणि विधायक चर्चा झाली. पश्‍चिम क्षेत्रातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या परिसरातून सैन्यमाघारीच्या संदर्भात या चर्चेत परस्परभूमिकांची देवाणघेवाण झाली. या परिसरातील सैन्याने संयम पाळावा आणि गैरसमजातून चूक करू नये आणि चुकीच्या हालचाली किंवा कृती करू नयेत याची खबरदारी दोन्ही देशांनी घ्यावी व तसे सैन्याला सांगावे असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

राम मंदिर निकालाची वर्षपूर्ती साजरी करण्यास मनाई; अयोध्येतील सर्व कार्यक्रम रद्द

भारत व चीनच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या पातळीवर उभायमान्य मुद्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यावर भर देतानाच या पत्रकात लष्करी आणि राजनैतिक पातळीवर संवाद प्रक्रिया जारी राखण्याचे मान्य करण्यात आलेले आहे. अन्य अनिर्णित मुद्यांवर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याची प्रक्रिया चालू ठेवण्याबरोबरच सीमेवर शांतता व स्थिरता राखण्याच्या मुद्याचाही यात पुनरुच्चार करण्यात आला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india china stand off 8th meeting without result

Tags
टॉपिकस
Topic Tags: