भारताचा निर्धार अधिक ठाम; पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना दिली घडामोडींची माहिती 

india-china
india-china

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लडाखमध्ये जाऊन चीनला दिलेल्या स्पष्ट इशाऱ्यानंतर सीमावादावर भारताचा निर्धार अधिक ठामपणे झळकू लागला आहे. याच मालिकेत पंतप्रधान मोदींनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन ‘देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींची’ माहिती दिली. तर, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनीही, भारतासमोर उभ्या केल्या जाणाऱ्या आव्हानांच्या मुकाबल्यासाठी दृढ निश्चयाची आवश्यकता असल्याचे सूचक प्रतिपादन केले. 

लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीनंतर सीमेवर भारताने चीनच्या तुल्यबळ सैन्य तैनात केले असून लष्करासोबतच हवाईदल आणि नौदलालाही सुसज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी लडाखमध्ये जवानांशी संवाद साधताना चीनला ‘विस्तारवादाचे युग संपले आहे’, असे सुनावताना लडाख भारताचा मुकुट असल्याचे म्हणत सीमावादावर तडजोड केली जाणार नसल्याचा इशारा दिला होता. 

त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. त्यांच्यातील चर्चेचा तपशील कळू शकला नसला तरी अर्धातास चाललेल्या या भेटीमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींची माहिती पंतप्रधानांनी दिल्याचे राष्ट्रपतींच्या कार्यालयातर्फे केलेल्या ‘ट्विट’मध्ये सांगण्यात आले. तर, तिन्ही सैन्यदलांचे सर्वोच्च कमांडर असलेल्या राष्ट्रपतींना पंतप्रधानांनी नियंत्रण रेषेवरील स्थितीबद्दलही माहिती दिल्याचे कळते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्व आघाड्यांवर सज्ज 
दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज सूचक वक्तव्याद्वारे चीनला इशारा दिला. दिल्लीत कोविड उपचार केंद्राची गृहमंत्री अमित शाह यांच्यासमवेत पाहणी केल्यानंतर संरक्षण मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी कोरोना संकट व सीमेवरील चीनचे संकट या मुद्द्यांवर भाष्य करताना, ‘रुग्णालये असो की सरहद्द असो, सर्व आघाड्यांवर आपली पूर्ण तयारी आहे. तयारीत आपण कुठेही मागे नाही’ असे विधान केले. 

आपण एकाच वेळी अनेक अंतर्गत आणि बाह्य आव्हानांना तोंड देत आहोत. परंतु आपल्याला जी आव्हाने उभी केली जात आहेत, त्यांचा मुकाबला करण्यासाठी दृढ निश्चय असायला हवा. 
- उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com