जाधव यांची पाककडून काहीही माहिती नाही : भारत

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 एप्रिल 2017

जाधव यांच्याशी पाककडून संपर्क साधता साधू दिला जात नाही. त्यांना ठेवलेल्या ठिकाणाबाबतही माहिती दिली जात नाही. जाधव नौदलातून निवृत्त झालेले आहेत. ते एक निष्पाप भारतीय नागरिक आहेत.

नवी दिल्ली - पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपावरून फाशीची शिक्षा सुनाविण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्याबाबत पाकिस्तानकडून कोणतीच माहिती देण्यात येत नाही. तसेच ते सध्या कोणत्या परिस्थितीत आहेत हेही सांगितले जात नसल्याचे, परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बगळे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, जाधव यांच्याशी पाककडून संपर्क साधता साधू दिला जात नाही. त्यांना ठेवलेल्या ठिकाणाबाबतही माहिती दिली जात नाही. जाधव नौदलातून निवृत्त झालेले आहेत. ते एक निष्पाप भारतीय नागरिक आहेत. त्यांना पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपावरून फाशीची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानने त्यांच्यावर केलेले आरोप दुर्दैवी आहेत. कोणताही हेर आपल्या खिशात भारतीय पासपोर्ट घेऊन कसा फिरेल. भारतातील नागरिकांचा जाधव यांना पाठिंबा आहे. जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल.

जाधव यांच्या सुटकेसाठी कोणाशी चर्चा करायची, हे आता सांगणे कठीण आहे. गेल्या वर्षी आम्ही इराणशी याबाबत चर्चा केली होती. वकीलात नसल्यामुळे त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नव्हती. जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यापूर्वी त्यांना ठेवलेल्या ठिकाणाबाबत पाकिस्तानला 13 वेळा माहिती विचारण्यात आली होती, पण त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही, असे बगळे यांनी सांगितले.

Web Title: India doesn't know Jadhav's location or how his health is, MEA says