भारतात 58% संपत्ती 1 टक्‍क्‍याच्या हाती!

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

देशातील केवळ 57 अब्जाधीशांकडे देशातील 70% लोकसंख्येइतकीच संपत्ती असल्याचेही या अभ्यासाद्वारे निष्पन्न झाले आहे. भारतामध्ये सध्या 84 अब्जाधीश असून त्यांची एकत्रित संपत्ती 248 अब्ज डॉलर्स इतकी आहे...

दावोस - जागतिक आर्थिक परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर ऑक्‍सफॅम या जगप्रसिद्ध संस्थेने मांडलेल्या अहवालामध्ये भारतामधील एकूण संपत्तीच्या 58% संपत्ती देशातील केवळ 1 टक्‍का लोकसंख्येच्या हाती एकवटली असल्याची माहिती देण्यात आली आहे. भारतामधील एकूण संपत्ती ही 3.1 लाख कोटी डॉलर्स इतकी आहे.

याचबरोबर देशातील केवळ 57 अब्जाधीशांकडे देशातील 70% लोकसंख्येइतकीच संपत्ती असल्याचेही या अभ्यासाद्वारे निष्पन्न झाले आहे. भारतामध्ये सध्या 84 अब्जाधीश असून त्यांची एकत्रित संपत्ती 248 अब्ज डॉलर्स इतकी असल्याचे ऑक्‍सफॅमने म्हटले आहे. रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे यांमध्ये आघाडीवर आहेत. अंबानी यांची एकूण संपत्ती 9.3 अब्ज डॉलर्स इतकी आहे.

जगातील अतिश्रीमंत व गरीब यांच्यामधील आर्थिक दरी ही गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक रुंदावली असल्याचे निरीक्षण ऑक्‍सफॅमने नोंदविले आहे. याचबरोबर, या समस्येवर केवळ भाषणे ठोकण्यापेक्षा खरी उपाययोजना करण्यात यावी, असे आवाहनही संस्थेकडून करण्यात आले आहे. या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यात न आल्यास अशा स्वरुपाच्या असमानतेच्या विरोधातील जनतेमध्ये असलेला संताप वाढून त्यामुळे मोठे राजकीय बदल घडण्याचा इशाराही संस्थेकडून देण्यात आला आहे.

Web Title: India facing income inequality