
झेंडे फडकवल्याबद्दल भारताची गिनिज बुकमध्ये नोंद; पाकिस्तानचा रेकॉर्ड मोडला
भारताने एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे. याबद्दल सांस्कृतिक मंत्रालयाने तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने झेंडे फडकवल्याबद्दल भारताच्या नावावर रेकॉर्ड झाला आहे.
वीर कुंवर सिंह विजयोत्सव कार्यक्रमादरम्यान ७८,२२० झेंडे फडकावण्यात आले. जगदीशपूर इथल्या दुलेर मैदानावर आयोजित केलेल्या या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हे तिरंगे फडकवण्यात आले. जगदीशपूरचे राजा वीर कुंवर सिंह हे स्वातंत्र्यलढ्यातल्या महान सैनिकांपैकी एक होते. त्यांच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
साधारण ७८ हजार भारतीयांनी या कार्यक्रमात भारताचा राष्ट्रीय तिरंगा फडकवला आणि पाकिस्तानचा रेकॉर्ड मोडला. गृहमंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि उपस्थित नागरिकांना विशेष बँड्स हातामध्ये परिधान करण्यास सांगितलं होतं, जेणेकरून त्यांची संख्या नोंदवता येईल. या कार्यक्रमाचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आलं आहे, अशी माहिती सांस्कृतिक मंत्रालयाने दिली.
यापूर्वी २००४ साली पाकिस्तानमध्ये जवळपास ५६,००० झेंडे फडकवल्याचा विश्वविक्रम नोंदवण्यात आला होता.
Web Title: India Guinness Records For Waving National Flags
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..