भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर 

पीटीआय
शुक्रवार, 22 जून 2018

डाळी, पोलादासह अमेरिकेच्या 29 उत्पादनांवर जादा करआकारणी करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर जादा कर आकारल्याने भारताने हे पाऊल उचलले आहे. 
 

नवी दिल्ली : डाळी, पोलादासह अमेरिकेच्या 29 उत्पादनांवर जादा करआकारणी करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर जादा कर आकारल्याने भारताने हे पाऊल उचलले आहे. 

अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, अमेरिकेच्या उत्पादनांवर जादा करआकारणी 4 ऑगस्टपासून सुरू होईल. यामध्ये वाटाणा, चना, मसूर डाळ यांच्यावरील 30 टक्के कर आता 70 टक्के करण्यात येईल. डाळींवरील कर 30 टक्‍क्‍यांवरून 40 टक्के केला जाईल. अमेरिकेतून आयात होणाऱ्या अख्ख्या बदामावरील आयात शुल्क प्रतिकिलो 100 रुपयांवरून 120 रुपये करण्यात येईल. सोललेल्या बदामावरील आयातशुल्क प्रतिकिलो 35 रुपयांवरून 42 रुपये होईल. 

बोरिक ऍसिडवरील आयात शुल्क 17.50 टक्के करण्यात आले असून, फॉस्फरिक ऍसिडवरील आयातशुल्क 10 टक्‍क्‍यांवरून 20 टक्के करण्यात आले आहे. पोलाद उत्पादनांवरील आयात शुल्क 15 वरून 27.50 टक्के करण्यात आले आहे. मागील आठवड्यात भारताने आयात शुल्कात 50 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्यात येणार असलेल्या 30 उत्पादनांची यादी जागतिक व्यापार संघटनेला (डब्लूटीओ) दिली होती. 

अमेरिकेने स्थानिक उद्योगांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी विदेशातून येणाऱ्या उत्पादनांवर जादा करआकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जागतिक पातळीवर व्यापार युद्ध सुरू होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. भारतातून आयात होणाऱ्या पोलाद आणि ऍल्युमिनियवर अमेरिकेने जादा कर आकारला आहे. अमेरिकेच्या निर्णयाला उत्तर म्हणून युरोपीय समुदाय आणि चीनने अमेरिकी उत्पादनांवर जादा कर आकारले आहेत.  

दुचाकींचा समावेश नाही 
अमेरिकेतून आयात होणाऱ्या 800 सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या दुचाकींवरील आयातशुल्कात वाढ करण्याचा उल्लेख अर्थ मंत्रालयाने केलेला नाही. "डब्लूटीओ'ला दिलेल्या यादीत भारताने हार्ले डेव्हिडसन आणि ट्रायम्फसह अन्य कंपन्यांच्या दुचाकींवरील आयातशुल्कात 50 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्यात येईल, असे म्हटले होते. 
 
भारताची अमेरिकेला निर्यात (2016-17) 
42.21 अब्ज डॉलर 
 
अमेरिकेतून भारतात आयात (2016-17) 
22.3 अब्ज डॉलर 

Web Title: India hikes customs duty on 30 items imported from US