पाकिस्तानी "गोडवा' राज्यासाठी "कडू'  

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 13 मे 2018

अशी आहे स्थिती... 
- 60 ते 65 लाख मेट्रिक टन साखरेची आयात 
- ऊस उत्पादकांचा विरोध असतानाही आयात 
- राज्यातील साखर उद्योगासमोर मोठे संकट 
- पाकिस्तानी साखरेचा दर 1 रुपयाने कमी 
- चिस्तीयन व लालुवल्ली सिंधची साखर

मुंबई - देशाच्या साखर उत्पादनाची राजधानी असलेल्या महाराष्ट्राला आता पाकिस्तानी साखरेचा गोडवा चाखावा लागणार आहे. साखर सम्राटांच्या गडातच मोदी सरकारने पाकिस्तानहून तब्बल 60 ते 65 लाख मेट्रिक टन साखर आयात केल्याने शेतकरी व साखर उद्योगासमोरील संकट वाढणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. 

पाकिस्तानमधील प्रसिद्ध "चिस्तीयन' व "लालूवल्ली सिंध' या ब्रॅंण्डची साखर नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाली असून, या साखरेच्या गोणीवर "पाकिस्तान शुगर'चा शिक्‍का पाहून व्यापारी देखील हवालदिल झाले आहेत. 

पाकिस्तानची साखर भारतीय बाजारभावापेक्षा 1 रुपयाने स्वस्त आहे. राज्यात यंदाच्या हंगामात जवळपास 60 ते 65 लाख मेट्रिक टनपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन झाले आहे. त्याशिवाय मागच्या हंगामातील दोन ते अडीच लाख मेट्रिक टन साखर पडून आहे. या अतिरिक्‍त साखरेचे करायचे काय, यावर साखर उद्योग विचारमंथन सुरू असताना पाकिस्तानच्या स्वस्त साखरेने साखर कारखानदारांची झोप उडवली आहे. 

मागील वर्षी किरकोळ बाजारात साखरेचे दर 40 ते 42 रुपये किलो होते. पण, दोन महिन्यांपासून हे दर खाली आले असून आता 36.50 ते 38 रुपये किलोवर स्थिर झाले आहेत. यंदाच्या गळीत हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे, हे दर आणखीन कोसळतील व ऊस उत्पादक व साखर कारखानदारी मोठ्या संकटात सापडेल अशी भीती व्यक्‍त होत आहे. 

Web Title: India Imports from Pakistan