भारत सुधारणार लडाखमधील रस्त्यांचे जाळे

पीटीआय
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

या प्रश्‍नावरील तातडीचा उपाय म्हणून त्या भागातील रस्त्यावर बर्फापासून बचावासाठी छत उभारण्याचीही एक कल्पना मांडण्यात आली आहे. दीर्घकालीन उपायांमध्ये रस्त्याची नव्याने बांधणी हादेखील एक पर्याय आहे.

नवी दिल्ली : लडाखमधील प्रत्यक्ष ताबारेषेजवळ चांगल्या दर्जाच्या रस्त्यांचे जाळे उभारण्याच्या योजनेवर भारतीय प्रशासकीय यंत्रणेने काम सुरू केले आहे. येथील वातावरणामुळे सातत्याने रस्त्यांची दुरावस्था होत असते. त्यावर दीर्घकालीन तोडगा काढण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. या भागातील रस्ते हे व्यूहात्मकदृष्ट्याही भारतासाठी महत्त्वाचे आहेत.

चीन आणि पाकिस्तानच्या आर्थिक विभागासाठी (सीपीईसी) काराकोरम भागात पायाभूत सुविधा उभारण्याची जोरदार मोहीम सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भारताने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सीमाभागातील रस्त्यांची देखभाल करणाऱ्या 'बॉर्डर रोड्‌स ऑर्गनायझेशन'ने केंद्रीय रस्ते विकास संस्थेकडून (सीआरआरआय) लडाखमधील रस्त्यांसंदर्भात सूचना मागविल्या आहेत. लडाखमधील सासोमा ते सासेर ब्रांग्सा या 55 किलोमीटरच्या टप्प्यातील रस्त्याचा दर्जा उंचावण्यासाठी काय उपाय असू शकतील, यावर त्यांनी मत मागविले आहे. या 55 किमीपैकी 10 किमी रस्ता वातावरणामुळे सतत खराब होत असतो. दरडी कोसळणे, कडाक्‍याची थंडी आणि बर्फवृष्टी यामुळे वर्षातील सहा ते सात महिने हा रस्ता बंदच असतो. त्यामुळे यावर दीर्घकालीन तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली जात होती. या प्रकल्पावर आता थेट पंतप्रधान कार्यालयातूनच लक्ष दिले जात आहे, अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली.
 

Web Title: India to improve road connectivity to LAC in Ladakh