स्वदेशी 'जीपीएस'च्या अडचणी संपेनात

पीटीआय
बुधवार, 14 जून 2017

बंगळूर - भारतीय दिशादर्शक प्रणाली (नाविक) सुरू करण्याच्या उद्देशाने भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या उपग्रहातील (आयआरएनएसएस-1ए) तिन्ही अण्विक घड्याळे काम करत नसल्याची माहिती समोर आली आहे; मात्र असे असले तरी इतर उपग्रहांतील अण्विक घड्याळांचे कार्य व्यवस्थित सुरू असल्याचे स्पष्टीकरण भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) आज देण्यात आले.

'इस्रो'चे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी स्पष्ट केले, की नाविक प्रकल्पातील सात उपग्रहांपैकी पहिल्या 'आयआरएनएसएस-1ए' उपग्रहातील तीन अण्विक घड्याळांमध्ये बिघाड झाला असून, त्यांचे कार्य पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे; मात्र त्याचा 'नाविक'च्या कार्यक्षमतेवर परिणाम होणार नाही. कारण, सातपैकी सहा उपग्रहांचे कार्य व्यवस्थित सुरू आहे. तसेच घड्याळे बंद पडलेल्या 'आयआरएनएसएस-1ए' उपग्रहाचा वापर संदेशवहनासाठी केला जाणार आहे, त्यामुळे 'नाविक'चे कार्य सुरळीत सुरू राहू शकेल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'नाविक'मधील दुसऱ्या एका उपग्रहातील दोन अण्विक घड्याळेही व्यवस्थित काम करत नाहीत. त्यामुळे बिघाड झालेल्या घड्याळांची संख्या पाचवर पोचली असल्याचा दावा करण्यात येत आहे; मात्र 'इस्रो'कडून त्यास दुजोरा मिळालेला नाही. अचूक वेळ निर्धारित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अण्विक घड्याळांचे काम बंद पडल्यास भारतीय दिशादर्शक प्रणालीच्या कामकाजात व्यत्यय येऊ शकतो, अशी शक्‍यता वर्तवली जाते. युरोपातून आयात करण्यात आलेली ही अण्विक घड्याळे भारतातील विविध ठिकाणांची अचूक माहिती देण्यासाठी वापरली जातात.

'आयआरएनएसएस -1ए' उपग्रहातील तिन्ही अण्विक घड्याळे बंद पडली आहेत; मात्र संदेशवहनासाठी या उपग्रहाचा वापर करण्यात येणार असल्यामुळे 'नाविक'च्या कार्यात अडचण येणार नाही. पर्यायी उपग्रह लवकरच अवकाशात पाठविला जाईल. इतर उपग्रहांचे कामकाज सुरळीत सुरू आहे.
- ए. एस. किरणकुमार, 'इस्रो'चे अध्यक्ष

Web Title: india made gps isro marathi news