भारताला 200 लढाऊ विमानांची गरज

भारताला 200 लढाऊ विमानांची गरज
भारताला 200 लढाऊ विमानांची गरज

नवी दिल्ली - अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या लांब पल्ल्याच्या "अग्नी-5' क्षेपणास्त्राची भारताकडून यशस्वी चाचणी घेण्यात आल्यानंतर त्यावर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत भारताने आपली संरक्षणक्षमता वाढविण्याचा कार्यक्रम सुरू ठेवावा, असे हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी आज स्पष्ट केले. पुढील दहा वर्षांत हवाई दलाला दोनशे ते अडीचशे लढाऊ विमानांची आवश्‍यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

मावळते हवाई दलप्रमुख राहा यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपत असून, त्यांनी आज पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. भारताने नुकत्याच केलेल्या "अग्नी-5' क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती. सुमारे 5,000 किलोमीटरचा पल्ला असलेल्या "अग्नी-5'च्या टप्प्यात संपूर्ण चीन येतो. याबाबत बोलताना चीनचे नाव न घेता राहा म्हणाले, की जोपर्यंत कोणी चुकीचे काही करत नाही तोपर्यंत इतरांना त्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. कठीण प्रसंगात शत्रूच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करण्याची क्षमता निर्माण करण्यात काहीही गैर नाही. भारत आपली संरक्षणक्षमता वाढवत असून, त्यामुळे शक्ती संतुलन राखण्यास मदतच होणार आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या नियमांचे पालन भारताकडून होईल आणि दक्षिण अशियातील शक्तिसंतुलन भारत बिघडू देणार नाही, अशी आम्हाला आशा आहे, असा इशारा चीनने दिला होता. त्याबद्दल बोलताना राहा म्हणाले, की आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीमध्ये अशा प्रकारचे इशारे, प्रतिइशारे नेहमीच दिले जातात. त्यामुळे आपल्या गरजा आणि संरक्षण क्षेत्रातील आव्हाने ओळखून आपल पावले टाकायला हवीत.

संरक्षण क्षेत्रातील भविष्यातील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आगामी दहा वर्षांत भारतीय हवाई दलाला 200 ते 250 लढाऊ विमानांची आवश्‍यकता असल्याचे राहा यांनी सांगितले. हवाई दलातील लढाऊ स्कॉड्रनची संख्या कमी होत 34 वर आली असल्याबद्दलही राहा यांनी नाराजी व्यक्त केली.

एस. पी. त्यागींची पाठराखण
ऑगस्टा वेस्टलॅंड गैरव्यवहार प्रकरणात अडकलेले माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी यांची अरूप राहा यांनी आज पाठराखण केली. जोपर्यंत त्यागी यांच्याविरोधातील आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याबद्दलचा आदर कायम असेल. त्यागी यांची पाठराखण करणारे राहा हे हवाई दलाचे दुसरे वरिष्ठ अधिकारी आहेत. यापूर्वी माजी हवाई दलप्रमुख ए. वाय. टिपणीस यांनीही त्यागी यांची बाजू घेतली होती. त्यागी यांना या प्रकरणात गोवले गेल्याचा आरोप टिपणीस यांनी केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com