फेसबुकवर नमो..., नमो... 

वृत्तसंस्था
शनिवार, 27 मे 2017

 

फेसबुक पेज फॉलोअर (26 मे 2014 ते 16 मे 2017) 
39,576,923 

नरेंद्र मोदी 

19,803,140 
डोनाल्ड ट्रम्प 

11,115,068 
पीएमओ इंडिया

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढली असल्याचे सांगण्यात आले.

जागतिक पातळीवर मोदी हे सर्वाधिक फॉलोअर असलेले नेते बनले आहेत. त्यांची फॉलोअर संख्या चार कोटी 17 लाखांपर्यंत पोचली आहे. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना याबाबत मागे सारले आहे. 

फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार मोदी यांच्या फेसबुक पेजला सर्वाधिक फॉलोअरची नोंद झाली आहे. मोदी यांचे अधिकृत पेज 'पीएमओ इंडिया'चे एक कोटी 31 लाख फॉलोअर असून याचा क्रमांक तिसरा आहे. त्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी व अधिकृत फेसबुक पेजच्या फॉलोअरची संख्या मोदी यांच्यापेक्षा कमी आहे. मोदी सरकारला तीन वर्षे झाल्यानिमित्त सरकारच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी जेवढे सर्व्हे किंवा मतदान चाचण्या घेण्यात आल्या, त्यात सरकारच्या लोकप्रियतेत भर पडल्याचे निदर्शनास आले आहे. 'डिजिटल इंडिया', 'मेक इन इंडिया', 'स्वच्छ भारत अभियान' या सरकारच्या योजना वचनपूर्तीच्या दिशेने जाणाऱ्या ठरल्या आहेत. 

''हे लोकप्रशासनाचे नवे रूप आहे. 'डिजिटल इंडिया', 'मेक इन इंडिया'सारख्या मोठ्या योजना या रोजगारनिर्मितीशी संबंधित असून, त्या जास्त परिणामकारक ठरल्या आहेत,'' असे फेसबुक इंडियाच्या दक्षिण व मध्य विभागाच्या सार्वजनिक उपक्रम संचालिका अंखी दास यांनी सांगितले. फेसबुकवरील मोदी यांच्या फॉलोअरबाबत बोलताना त्या म्हणाल्या, ''2014मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मोदी यांची फॉलोअर संख्या एक कोटी चार लाख होती. आज त्यांच्या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली असताना मोदी यांच्या फॉलोअरने चार कोटी 17 लाखांचा टप्पा गाठला आहे. मोदी यांनी नोटाबंदीसारखे कठोर निर्णय घेतले असले, तरी त्यांची लोकप्रियता वाढत असल्याचे दिसत आहे. या दरम्यान त्यांच्या फॉलोअरमध्ये 40 लाखांनी वाढ झाली आहे.'' 

फेसबुकच्या माहितीनुसार या सोशल मीडियावरून नागरिकांशी जास्तीत जास्त संवाद साधणाऱ्या नेत्यांमध्ये मोदी यांच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, मंत्री स्मृती इराणी, व्ही. के. सिंह, पीयूष गोयल आणि अरुण जेटली यांचा क्रमांक लागतो. मंत्रालयाच्या पातळीवर माहिती व नभोवाणी विभाग, परराष्ट्र मंत्रालय आणि रेल्वे खाते ही तीन मंत्रालये पहिल्या तीन क्रमांकांत आहेत. बराक ओबामांचा विक्रम अबाधित 
बर्नसन - मारस्टेलर यांनी जानेवारी 2017 मध्ये केलेल्या अभ्यासानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फेसबुकवर जगातील सर्वांत लोकप्रिय नेते आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक जिंकलेले डोनाल्ड ट्रम्प यांची फॉलोअर संख्या दोन कोटी दोन लाख असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मोदी जगाभर लोकप्रिय असले तरी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या लोकप्रियतेचा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही. अध्यक्षपदावरून पायउतार झाले तरी त्यांचे पाच कोटी चार लाख फॉलोअर आहेत.

Web Title: India News Maharashtra News Narendra Modi BJP Facebook