नितीश-मोदी खलबतांमुळे 'संशयकल्लोळ'

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 28 मे 2017

नितीशकुमार-मोदी यांच्यात तब्बल अर्धा तास खलबते झाली, तेव्हा राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली. नितीशकुमार यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी बिहारच्या विकासाबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली व त्यासाठी तसेच तोंडावर आलेल्या पावसाळ्यात बिहारमध्ये येऊ घातलेल्या पुरासारख्या आपत्तीच्या निवारणाबाबत केंद्राचे सहकार्य मागितले.

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी (ता. 26) दिल्लीत बोलावलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला दांडी मारणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार पुढच्या 24 तासांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी पोचले आणि उभयतांमध्ये सुमारे अर्धा तास बंदद्वार चर्चाही झाली.

नितीशकुमार यांनी 'ही फक्त पंतप्रधान-मुख्यमंत्री अशा स्वरूपाची भेट होती व बिहारचा विकास हाच त्यातील एकमेव चर्चा विषय होता,' अशी सारवासारव केली; मात्र मोदींना नितीशकुमारांनी भेटणे या एकाच घटनेमुळे राजधानीत 'राजकीय संशयकल्लोळा'चा नवा अंक दणक्‍यात सुरू झाला आहे. 

बेनामी संपत्तीप्रकरणी नितीशकुमार यांचे सत्तेतील भागीदार लालूप्रसाद यादव यांच्याभोवती सरकारच्या यंत्रणांनी चौकशीचे फास आवळताच लालूंनी 'भाजपला त्यांचे नवीन मित्र मुबारक असोत,' असा टोमणा मारला होता. सोनियांनी काल बोलावलेल्या बैठकीला नेमके नितीशकुमारच हजर नव्हते. त्या बैठकीला 24 तास उलटण्याच्या आत नितीशकुमार दिल्लीत आले व त्यांनी मोदींबरोबर खलबतेही केली. याची चर्चा सुरू होताच नितीशकुमार यांनी सारवासारव केली. सायंकाळी त्यांनी बिहार भवनावर पत्रकारांना बोलावून घेत पुन्हा सारवासारव केली; पण पत्रकारांच्या चेहऱ्यावरील अविश्‍वास कायम असलेला पाहून अखेरीस त्यांनी अक्षरशः हात जोडले. 

भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद जगन्नाथ यांच्या सन्मानार्थ दिलेल्या मेजवानीला नितीशकुमार यांनाही मोदींनी आमंत्रित केले होते. या आवतणाचा नितीशकुमार यांनी स्वीकार केला व ते दिल्लीत पोचले. मॉरिशसबरोबर बिहारचे जुने ऋणानुबंध आहेत व तेथे 50 टक्के मजूर बिहारी आहेत. त्यामुळे प्रवींद यांना आपण भेटणारच आहोत, असेही त्यांनी म्हटले होते. 

विकासाबाबत चर्चा 
नितीशकुमार-मोदी यांच्यात तब्बल अर्धा तास खलबते झाली, तेव्हा राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली. नितीशकुमार यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी बिहारच्या विकासाबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली व त्यासाठी तसेच तोंडावर आलेल्या पावसाळ्यात बिहारमध्ये येऊ घातलेल्या पुरासारख्या आपत्तीच्या निवारणाबाबत केंद्राचे सहकार्य मागितले.

पुराबाबत केंद्राने एक आपत्ती निवारण पथक वेळेवर बिहारमध्ये पाठवावे, असेही त्यांनी सांगितले व मोदींनी ते तत्काळ मान्य केले. लालूप्रसाद यांच्यावरील आरोपांबाबत टिप्पणी करण्यास नकार देताना नितीशकुमार म्हणाले, की कालच्या बैठकीत जी चर्चा झाली, त्याच मुद्द्यांवर मी सोनिया गांधींशी गेल्या महिन्याच्या 20 तारखेलाच विस्ताराने चर्चा केली आहे. त्यामुळे मी काल दिल्लीत हजर नव्हतो.

Web Title: India News Maharashtra News Narendra Modi Nitish Kumar Bihar news BJP