भाजप महिलेला प्राधान्य देण्याची शक्‍यता

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 जून 2017

नवी दिल्ली - देशाचे पहिले नागरिक म्हणजेच राष्ट्रपतिपदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनातील भाजपचा उमेदवार ही एक महिलाच असणार, या शक्‍यतेला बळ मिळणाऱ्या घटना राजधानीत घडू लागल्या आहेत. '17 जुलैला होणाऱ्या या निवडणुकीबद्दल भाजप आताच काहीही बोलणार नाही, ही आमची भूमिका आहे; पण एका महिलेने याबद्दल विचारल्यानेच मी यावर बोलत आहे,' असे एका ज्येष्ठ सत्तारूढ नेत्याने आज वरीलप्रमाणे कारण सांगून राष्ट्रपतिपदाबाबत सावध वक्तव्य केले; मात्र यामुळे उपस्थितांच्या मनात शक्‍यता जन्माला आली.

नवी दिल्ली - देशाचे पहिले नागरिक म्हणजेच राष्ट्रपतिपदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनातील भाजपचा उमेदवार ही एक महिलाच असणार, या शक्‍यतेला बळ मिळणाऱ्या घटना राजधानीत घडू लागल्या आहेत. '17 जुलैला होणाऱ्या या निवडणुकीबद्दल भाजप आताच काहीही बोलणार नाही, ही आमची भूमिका आहे; पण एका महिलेने याबद्दल विचारल्यानेच मी यावर बोलत आहे,' असे एका ज्येष्ठ सत्तारूढ नेत्याने आज वरीलप्रमाणे कारण सांगून राष्ट्रपतिपदाबाबत सावध वक्तव्य केले; मात्र यामुळे उपस्थितांच्या मनात शक्‍यता जन्माला आली.

राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक आयोग येत्या 16 जूनला अधिसूचना जारी करण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर लगेचच भाजप मोदींनी निश्‍चित केलेल्या नावाची घोषणा करेल, असे सांगितले जाते. त्यापूर्वी भाजप सरकारे व नेते तसेच 'एनडीए'च्या बैठकांचा उपचार पार पाडला जाईल. या निवडणुकीसाठी आतापावेतो लालकृष्ण अडवानी, सरसंघचालक मोहन भागवत, डॉ. मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, राम नाईक, झारखंडाच्या राज्यपाल द्रौपदी मार्मू, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, पंजाबाचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल तसेच एम. वेंकय्या नायडू, विजया रहाटकर आदी अनेकानेक नावांचे चर्वण माध्यमांनी केले आहे. संभाव्य उमेदवार एक महिलाच असेल का, याबद्दलची शक्‍यताही दाटपणे व्यक्त होत आहे. त्यातही ही महिला अल्पसंख्याक वर्गातील असण्याचीही शक्‍यता आहे; मात्र ते नाव नजमा हेप्तुल्ला हे नसेल, असे भाजप नेते छातीठोकपणे सांगतात. तलाक पीडित मुस्लिम माताभगिनींबाबत पंतप्रधानांनी अलीकडे वारंवार सहवेदना व्यक्त केली आहे.

भाजपच्या एका नेत्याला आज राष्ट्रपतिपदाबाबत विचारले असता, त्यांनी कानावर हात ठेवले; मात्र हाच प्रश्‍न काही मिनिटांनी एका महिला पत्रकारने विचारला तेव्हा त्यांनी, केवळ महिलेने विचारल्यानेच मी यावर बोलत आहे, असे सांगितले. त्यावर पत्रकारांनी, 'म्हणजे भाजपमध्ये यापुढचा महिनाभर स्त्रीशक्तीला अधिक प्राधान्य मिळणार, याचे हे लक्षण मानायचे का,' असे विचारल्यावर मात्र त्यांनी तेथून काढता पाय घेतला. जाण्यापूर्वी त्यांनी या विषयावर नेमलेली त्रिसदस्यीय समिती भाजप संसदीय मंडळाशीही चर्चा करेल, असे नमूद केले. त्यासाठी या मंडळाची वेगळी बैठक बोलवायची की त्याच्याशी वेगवेगळा संवाद साधायचा, हे अरुण जेटली, राजनाथसिंह व नायडू ठरवतील, असे त्यांनी नमूद केले; मात्र पंतप्रधान मोदी 24 तारखेला अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याआधी भाजपच्या उमेदवाराची घोषणा झालेली असेल, अशी पुष्टी त्यांनी जोडली.

आपली समिती सर्व राजकीय पक्षांबरोबर चर्चा करेल व व्यापक सहमतीसाठी प्रयत्न करेल. आम्ही राजकीय पक्षांशी खुलेपणाने चर्चा करून सहमतीचा पाया तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
- वेंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री

शर्यतीत नाही : बादल
राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचे स्पष्ट करून प्रकाशसिंग बादल (वय 90) यांनी या संदर्भातील तर्कांना आज पूर्णविराम दिला. या सर्वोच्च पदाची जबाबदारी पेलण्याएवढी आपली प्रकृती सक्षम नसल्याचे ते म्हणाले. अखेरपर्यंत मला पंजाबच्या भल्यासाठी काम करावयाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: india news marathi news bjp news presidential election