शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेले सरकार आंदोलनावरून काँग्रेस, माकपचे टीकास्त्र

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 जून 2017

नवी दिल्ली - महाराष्ट्र आणि पाठोपाठ मंदसोर (मध्य प्रदेश) येथे झालेल्या शेतकरी आंदोलनांना पाठिंबा देण्याबरोबरच त्यावर बाळगलेल्या मौनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने आज जोरदार टीका केली. "शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेले सरकार,' अशा शब्दांत काँग्रेसने भाजप व केंद्र सरकारवर टीका केली, तर खोटी आश्‍वासने देऊन काल्पनिक जगात वावरणारे सरकार, असा टोला मार्क्‍सवाद्यांनी लगावला.

काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी वार्तालापात बोलताना शेतकऱ्यांच्या मागण्या विचारात घेण्याऐवजी सरकारने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळ्यांचा वर्षाव केला आणि सहा शेतकऱ्यांचा त्यात मृत्यू झाला; परंतु त्याबाबत पंतप्रधानांकडून एका शब्दानेही प्रतिक्रिया किंवा श्रद्धांजली आली नाही, यावरून सरकारची असंवेदनशीलता आणि नकारात्मकता लक्षात येते, असे सांगितले. ते म्हणाले, की काश्‍मीरबाहेर इंटरनेट सेवा बंद करण्याचा प्रकार आतापर्यंत घडलेला नव्हता; परंतु मोदी सरकारने शेतकरी आंदोलनग्रस्त भागात इंटरनेट बंद करण्याचा प्रकार केला आहे आणि जणू काही शेतकरी दहशतवादी असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला आहे.
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षानेही सरकारवर जोरदार टीका केली. शेतकरी एकीकडे आंदोलन करत आहे आणि त्यांच्यावर गोळीबार केला जात आहे, तर दुसऱ्या बाजूला बड्या उद्योगांतर्फे सामाजिक जबाबदारीच्या नावाखाली सरदार पटेलांच्या पुतळ्यासाठी देणग्या देण्याचे आदेश सरकारतर्फे दिले जात आहेत, हे एक विडंबन आहे, असे पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी सांगितले.

येचुरींसमोर घोषणा
येचुरींची पत्रकार परिषद उधळण्याचा प्रयत्न आज हिंदू सेना नावाच्या संघटनेतर्फे करण्यात आला. येचुरी पत्रकार परिषदेसाठी येत असतानाच त्यांच्या वाटेत उभे राहून या संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांनी "सीपीएम मुर्दाबाद', "भारत माता की जय' अशा घोषणा दिल्या. पक्षाच्या मुखपत्रात भारतीय लष्करावर त्यांच्या काश्‍मीरमधील भूमिकेवरून करण्यात आलेल्या टीकेच्या निषेधार्थ त्यांनी हा प्रकार केला. उपेंद्रकुमार आणि पवन कौल ही त्यांची नावे असून पत्रकार असल्याचे सांगून त्यांनी प्रवेश मिळविला होता. त्यांची संघटना रा. स्व. संघाशी संलग्न असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजले.

Web Title: india news national news narendra modi bjp congress